Download App

विधान परिषदेला विसरले, राज्यसभेला डावलले… हर्षवर्धन पाटलांवर आता थेट केंद्रात नवी जबाबदारी

मुंबई : राज्याचे माजी सहकार मंत्री आणि भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज (16 फेब्रुवारी) नवी दिल्लीमध्ये महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांना संधी देण्यात आली नव्हती. मात्र आता अध्यक्षपदी संधी देऊन पाटील यांचे पुनर्वसन करण्यात आल्याची चर्चा आहे. (BJP leader Harshvardhan Patil has been elected unopposed as the president of the National Cooperative Sugar Factory Federation.)

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची 2024 ते 2029 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर आज (16 फेब्रुवारी) नवी दिल्लीत अध्यक्षांच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक पार पडली. यात हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या सुचनेनुसार ही निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्षे याच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना या दोन्ही महासंघामध्ये वरिष्ठ संचालक म्हणून काम केले आहे.

प्रफुल्ल पटेल तब्बल 483 कोटींचे मालक! देवरा, अशोक चव्हाणांचीही संपत्ती कोट्यावधींच्या घरात

कोण आहेत हर्षवर्धन पाटील?

बारामतीचे काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव पाटील यांचे हर्षवर्धन पाटील हे पुतणे आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी 1995, 1999, 2004 आणि 2009 असे सलग चारवेळा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. तसेच ते जवळपास 20 वर्षे मंत्री म्हणूनही काम केले आहे. यात त्यांनी सर्वाधिक काळ सहकार मंत्री म्हणून काम केले आहे. मात्र 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांचा 14 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर 2019 मध्येही त्यांचा तीन हजार मतांनी पराभव झाला.

“नुसतं संसदेत भाषण करुन, उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” : अजितदादांचा सुप्रियाताईंवर थेट हल्लाबोल

त्यानंतर राज्यात दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता देशपातळीवरील साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

follow us