पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार अश्विनी जगताप चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. “मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे, माझ्या नादी लागू नका. पाठीमागून वार करू नका”, अशा शब्दात भाजप शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांना त्यांनी खडसावले. (BJP MLA Ashwini Jagtap got angry at the press conference held to inform about the visit of BJP State President Chandrashekhar Bawankule)
शांत, संयमी स्वभाव असलेल्या अश्विनी जगताप कधी कुणावर फारशा रागवत नाहीत. मात्र आसन व्यवस्थेवरुन डावलल्यामुळे त्यांचे हे रौद्र रुप पाहायला मिळाले. पण त्यांना नेमके कोणी डावलले आणि आमदार महोदयांचा अशा पद्धतीने अपमान नेमका कोणी केला? यामागील मास्टरमाईंड नेमका कोण आहे? याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘महाविजय- २०२४’अभियान सुरू केले आहे. त्यात महाराष्ट्रात ४८ पैकी महायुतीने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचीच तयारी म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 11 ऑक्टोबरला मावळ लोकसभा दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या या दौऱ्याची माहिती देण्याासाठी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषद बोलावली होती.
यावेळी त्यांच्या वहिनी आणि भाजप आमदार अश्विनी जगताप देखील उपस्थित होत्या. मात्र प्रोटोकॉलनुसार त्यांची खुर्ची योग्य जागी न ठेवता कडेला ठेवल्याने त्यांचा पारा चढला “मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे माझ्या नादी लागू नका, पाठीमागून वार करू नका”, अशा शब्दात त्यांनी ढाके यांना सुनावले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह भर पत्रकार परिषदेत समोर आला.
स्वभावाने शांत, संयमी असलेल्या अश्विनी जगताप मितभाषी असून फारसं कुणाला टोचून बोलत नाहीत. मात्र यापूर्वीही पक्षाच्या कार्यक्रमाचा निरोप वेळेवर न मिळाल्याबाबत त्यांनी नाराजी बोलून दाखविली होती. महिला म्हणून दुजाभाव केला जात असल्याची त्यांची खंत आहे. पत्रकार परिषदेत झालेल्या प्रकाराबद्दल त्या ढाके यांना बोलून गेल्या मात्र त्यांचा नेमका राग कुणावर आहे?, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
झालेल्या प्रकाराबद्दल दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक भाजप नेते राम वाकडकर यांनी नाराजी व्यक्त केली असून ढाके यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांचा राजीनाम्याची त्यांनी मागणी केली आहे. पण यामागील खरा मास्टरमाईंड कोण आहे? आमदार महोदयांचा अशा पद्धतीने अपमान करण्याचे धाडस नेमके कोणाचे आहे? असा सवाल विचारला जात आहे.
स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांचे दीर शंकर जगताप यांची भाजप शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकतीच आपली नवीन कार्यकारणी देखील जाहीर केली आहे.
याच कार्यकारणीमध्ये ढाके हे सरचिटणीस म्हणून काम पाहतात. मात्र, झालेल्या या प्रकारामुळे शहर भाजपमध्ये काही अलबेल नसल्याच चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. आता या घटनेचे भविष्यात काय पडसाद उमटतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.