Download App

Letsupp Special : गडकरींचा हुकमी एक्का ठाकरेंच्या गळाला; भाजपचे दोन शहरातील टेन्शन वाढणार!

भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने भाजपला दोन शहरांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पवार यांच्यामुळे भाजपचे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे पिंपरी – चिंचवड शहरातील आणि नांदेड जिल्ह्यातील राजकीय गणित बिघडणार असल्याचे बोलले जाते. (BJP’s Pimpri-Chinchwad senior leader and state spokesperson Eknath Pawar joined the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party)

मुळचे नांदेड जिल्ह्यातील असलेले एकनाथ पवार यांची कामगार नेते म्हणून राजकीय कारकीर्द सुरु झाली. 90 च्या दशकात एकनाथ पवार कामासाठी पुण्यात आले. टाटा मोटर्समध्ये काम करु लागले. हळू हळू टाटा मोटर्समधील कामगार नेते म्हणून ते उदयास आले. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या भाजपमधील जुन्या जोडगोळीच्या नेतृत्वात त्यांनी भाजपचे काम सुरु केले. अल्पावधीतच ते नितीन गडकरी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले.

Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड; मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

ज्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची कुठली ताकद नव्हती त्यावेळी एकनाथ पवार यांनी तरुण कार्यकर्त्यांना हाताशी धरुन पक्षाची खिंड लढवण्याचे काम केले. 2012 साली त्यांची भाजपचे शहराध्यक्ष म्हणून निवड झाली. 2014 ला भोसरी विधानसभेची निवडणुकही त्यांनी लढवली. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली होती. पण त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि अपक्ष अशा चौरंगी लढतीमध्ये थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तर अपक्ष महेश लांडगे यांचा विजय झाला.

या पराभवाने खचून न जाता पवार यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये ते पूर्णानगर, संभाजी नगर प्रभागातून निवडून आले. तिथून तीन वर्षे महापालिकेत त्यांनी सत्तारुढ पक्षाचे पक्षनेते भूमिका बजावली. मात्र, स्थायी समिती सभापती म्हणून त्यांना संधी देण्यात आली नाही. स्थानिक आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील स्थानिक राजकारणाचा फटका एकनाथ पवार यांना बसला असल्याचे बोलले जाते.

जुन्या-नव्या नेत्यांमधील वादाचा पवार यांना फटका :

2019 च्या विधानसभेलाही पवार इच्छुक होते. मात्र लांडगे यांच्यामुळे पवार यांना संधी मिळाली नाही. पण त्यानंतरही वरिष्ठांचा आदेश मानत त्यांनी पक्षाचे काम केले. पण स्थायी समिती सभापतीपदी डावलल्यानंतर तिथूनच पवार यांच्या नाराजीला सुरुवात झाल्याचे बोलले गेले. पक्षाची ताकद नसताना आपण पक्ष वाढवला पण आता पक्ष मोठा झाल्यानंतर दुसऱ्या पक्षातून ताकतवर नेते पक्षाने आयात केले. त्यामुळे जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांची गोची होत आहे, याबाबत अनेकदा दबक्या आवाजात पक्षात बोलले जात होते. पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या जुन्या नेत्यांचा संघर्ष काही नवा नाही. मात्र, आजवर पक्षशिस्तीमुळे कुणी उघड बोलत नव्हतं. पण आता पवारांनी पक्ष सोडल्याने ते आता उघड झालं आहे.

Manoj Jarange : वाहनांच्या तोडफोडीचे समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

पिंपरी-चिंचवडचा होल्ड ठेवण्यासाठी भाजपला कष्ट घ्यावे लागणार?

एकनाथ पवार यांच्या शिवसेना प्रवेशाचा पिंपरी-चिंचवड भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे चित्र आहे. हा प्रवेश भाजपला एक प्रकारे धोक्याची घंटा असल्याचेही बोलले जाते. पवार हे भाजपचे जुने नेते होते. ते बोलले म्हणून त्यांची नाराजी समोर आली. मात्र त्यांच्याशिवाय भाजपमधील अन्य जुने नेतेही नाराज असल्याचे सांगितले जाते. जुन्या आणि एकनिष्ठ नेत्यांमधील हा नाराजीचा सूर वेळेत ओळखला जावा अन्यथा याचा फटका आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. सोबतच पवार हे मुळचे मराठवाड्यातील असल्याने शहरात मोठ्या संख्येने असलेल्या मराठवाड्यातील मतदारांवर त्यांचा प्रभाव होता.

ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला बूस्टर डोस :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शहरातील अनेक नेते मंडळी त्यांच्या गटात गेले. त्यामुळे ठाकरे गटाची भिस्त ही शहराध्यक्ष सचिन भोसले, स्थानिक नेते आणि शिवसैनिकांवरच होती. मात्र, पवारांच्या रूपाने ठाकरेंच्या शिवसेनेला यामुळे बूस्टर डोस मिळाला आहे. पवार हे मुरलेले राजकारणी असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फायदा होऊ शकतो. शहरातील भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. शिवाय भाजपची सगळीच पाळेमुळे माहित असलेला नेता सोबत असल्याने भाजपवर थेट प्रहार करण्याची संधीदेखील ठाकरे गटाला मिळाली आहे.

श्यामसुंदर शिंदेंविरोधात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी :

लांडगे आणि राष्ट्रवादी यांच्यामुळे पवार यांना भोसरीतून संधी नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच चार वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील लोहा – कंधार मतदारसंघात काम सुरु केले आहे. या मतदारसंघातून सध्या शेकापचे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत. पण ते भाजपचे निकटवर्तीय मानले जातात. ते खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे मेव्हणेही आहेत. त्यांना या मतदारसंघातून भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवायची होती. परंतु हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे गेला. त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची मतदारसंघातील ताकद ओळखून तिकडून उमेदवारी मिळवली. तर शिवसेनेने भाजपमधून आलेल्या मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी दिली होती.

PM मोदींच्या दौऱ्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद; सभेला निघालेल्या बसवर दगडफेक

युती धर्माप्रमाणे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र चिखलीकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर आणि कन्या प्रणिता देवरे यांनीही श्यामसुंदर शिंदे यांचा जोरकस प्रचार केला. निकालात त्यांनी 64 हजारांचे मताधिक्य घेतले. निकालानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. तसंच चिखलीकरांसोबत फडणवीस यांची भेटही घेतली. शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीत असूनही शिंदे यांनी फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने त्यावेळी आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते.

यानंतर 2022 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभव स्विकारावा लागला होता. आता आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. हेच सगळे राजकारण गृहीत धरुन ठाकरे गटाने शिंदे यांच्या विरोधात भाजपचाच हुकमी एक्का फोडला असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us