ब्रेकिंग : दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा जीव घेणाऱ्या बिबट्यास गोळ्या झाडण्याचे आदेश निघाले
शिरूर जिल्ह्यात दोन बालकांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनविभाकडून अखेर देण्यात आले आहे.
Pune Shirur District Forest Department Orders To Shoot Leopard : शिरूर तालुक्यात दोन बालकांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनविभाकडून अखेर देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेळ येथे बिबट्याच्या (Leopard ) हल्ल्यात 5 वर्षांच्या शिवन्या बोंबेचा मृत्यू झाला होता. तर, 22 ऑक्टोबर 2025 रोजी मौजे जांबूत, ता. शिरुर, जि. पुणे येथे श्रीमती भागाबाई रंगनाथ जाधव, वय ७० वर्षे या महिलेचा वन्यप्राणी बिबटच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर काल (दि.2) रोहन विलास बोंबे, वय १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले. सातत्याने नागरिकांवर होणाऱ्या बिबट्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलन करत जाळपोळदेखील केली होती. अखेर तिघांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनविभागाने (Forest Department) दिले आहेत.
वनविभागाचा आदेश काय?

बिबट्याला ठार मारण्याचे आदेश
जुन्नर वनविभागातील शिरुर वनपरिक्षेत्राअंतर्गत मौजे पिंपरखेड, ता. शिरुर, जि. पुणे या परिसरात वावरत असलेला व मानवी जिवीतास धोकादायक ठरलेला बिबटयास तसेच गरजेप्रमाणे तंज्ञाचे उपस्थितीत व पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्गदर्शक सुचनेत नमुद केल्यानुसार बेशुध्द करून बंदीस्त करुन घेण्याची अथवा जेरबंद न झाल्यास बिबटयास ठार करण्याची मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. सदर आदेश दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत वैध राहतील. असे वनविभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

बिबट्याचा विषय राजकारणाचा नाही – वळसे पाटील
एकीकडे बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश येत असल्याने विविध स्तरातून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बिबट्याच्या विषयावरून राजकारणाचा न करण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या-मानवी संघर्ष टोकाला पोहचला आहे. आपल्या आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघासह पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून रोज हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. शेतकरी आणि त्याचं पशुधन या हल्ल्यात शिकार होताना पाहून रोज मनं अस्वस्थ होत असल्याचे वळसे पाटलांनी म्हटले आहे.
नम्र सूचना!
बिबट्या-मानवी संघर्ष टोकाला पोहचला आहे. आपल्या आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघासह पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून रोज हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. शेतकरी आणि त्याचं पशुधन या हल्ल्यात शिकार होताना पाहून रोज मनं अस्वस्थ होतं.
आपल्या… pic.twitter.com/Ii6SrqxD4Y
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) November 3, 2025
आपल्या लोकांनी तर मागच्या काही दिवसांत अनेक वाईट घटना पाहिल्या आहेत. उध्वस्त झालेले संसार पाहून मन सुन्न होतंय. हा प्रश्न फक्त आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि हा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. याबाबत आपल्या कोणत्याही पदाधिकारी, सहकारी व कार्यकर्त्याने राजकारण करू नये, अशी माझी स्पष्ट सूचना आहे. हा विषय राजकारणाचा नाहीये, आपल्याला राजकारण करायला पुढच्या काळात अनेक संधी आहेत, पण बिबट्या-मानवी प्रश्नात कोणतंही राजकारण आपल्याला करायच नाही, आपल्याला या विषयाची संवेदनशीलता समजून घेत संयम ठेवायचा आहे.
धक्कादायक! माजी क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला; पाळीव कुत्र्याच्या मदतीने वाचला जीव
बिबट्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे
बिबट्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे आणि तो कायदा केंद्रातून लागू करण्यासाठी आपले प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करायच आहे, या विषयाचं राजकारण करुन लोकांची दिशाभूल करायची नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होताना आपल्या एकाही पदाधिकारी, सहकारी व कार्यकर्त्याने या विषयाची संवेदनशीलतेला धक्का बसेल, असं कृत्य करू नये! या आमच्या स्पष्ट सूचना असल्याचे वळसे पाटलांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमुद केले आहे.
बळी जात असताना सरकारकडून निष्ठूरपणे बघण्याचे काम – कोल्हे
जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली होती.डॉ. कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी केली होती.
शिरुर लोकसभा मतदारसंघात बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले सातत्याने वाढत आहेत. गेल्या दीट महिन्यात हे संकट अधिकच तीव्र झाले असून बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये या काळात चार निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. याखेरीज गेल्या काही दिवसांत वनविभागाने 7 बिबट्यांना जेरबंद केले आहे. पण सातत्याने… pic.twitter.com/93Ui8OkWKG
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 2, 2025
पिंपरखेड येथे अवघ्या १० दिवसात २ लहानग्या निष्पाप जीवांचा बळी गेला, तर महिनाभरात ही तिसरी घटना घडली असे असूनही राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, ही अतिशय चीड आणणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले असून भरदिवसा माता-भगिनी आणि लेकरांचा बळी जात असताना सरकार निष्ठूरपणे बघत आहे. त्यामुळेच आज नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की, यापुढे एकही क्षण न दवडता आमच्या जिवाभावाच्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.
