मी अगोदरच ठरवलं होतं की मला (Pune) शस्त्रक्रिया करायच्या आहेत. ज्यावेळी एमबीबीएसला प्रवेश घेतला, तेव्हा पुढं काय काय आहे याची माहिती नव्हती. ज्यावेळी शस्त्रक्रियेचे पर्याय होते, त्यामध्ये मला हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली. शिक्षणानंतर पुण्यात सुरुवात केली. त्यामध्ये महिन्याला साधारण 75 ते 80 लोकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करतो, असं पुण्यातील सुप्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ. इब्राहिम पटेल यांनी सांगितलं. ते लेट्सअप मराठीवर लेट्सअप हेल्थ या खास मुलाखतीत बोलत होते.
यामध्ये कोणत्या वयातील रुग्ण असतात, असं विचारलं असता, मी 3 महिन्यांच्या बाळापासून ते 92 वर्षांच्या व्यक्तीच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली आहे, असं डॉ. पटेल म्हणाले आहेत. हृदयाचं छिद्र, व्हॉल्व शस्त्रक्रिया, फुप्फुस शस्त्रक्रिया, व्हॉल्व रिपेअर शस्त्रक्रिया असे अनेक प्रकार यामध्ये आहेत. आपल्याला हृदयाची शस्त्रक्रिया म्हटलं की बायपास वाटतं, पण यामध्ये किमान 25 ते 30 प्रकार आहेत. यामध्ये अनेकदा बायपास आणि इतर शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्याची वेळ येते. तेही आम्ही केलं आहे, असंही ते म्हणाले.
अशा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊच नये, यासाठी काय करावं, असं विचारलं असता डॉ. पटेल म्हणाले, काही गोष्टी आपल्या हातात आहेत, तर काही आपल्या हातात नाहीत. यामध्ये हृदयाचं छिद्र असणं हे आपल्या हातात नाही. आणि आपल्या हातात असलेल्या गोष्टी म्हटलं तर सिगारेट, तंबाखू, दारू, साखर आणि वजन या गोष्टी आहेत. त्यामुळं याकडं लक्ष दिलं, तर तुम्हाला यापासून संरक्षण मिळू शकतं.
इंग्रजी शिक्षणाच्या भवितव्यावर पुण्यात जागतिक मंथन; 7 ऑक्टोबरपासून ‘ELTAI’ आंतरराष्ट्रीय परिषद
हृदयाचा सर्वात मोठा शत्रू कोण, असं विचारलं असता डॉक्टर पटेल म्हणाले, यामध्ये सर्वात नंबर एकचा शत्रू तंबाखू आहे. तंबाखूमुळं कॅन्सरच होतो असं नाही, तर इतरही मोठे धोके आहेत. आपल्याकडं तरुण-तरुणी आणि अनेक नागरिकांमध्ये तंबाखूचं प्रमाण खूप आहे. अनेक महिला मिस्त्री लावतात, ती तंबाखूच असते. त्यामुळं ही भारतातली सगळ्यात मोठी समस्या आहे. दरम्यान, दारूमुळं रक्तवाहिन्या साफ होत नाहीत, त्या विस्तारतात. दारूमुळं ब्लॉकेज होत नाही, पण हृदयाचा आणि साखरेचा प्रॉब्लेम होतो, असंही डॉक्टर यावेळी म्हणाले.
तेलाबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले, आपल्याकडचं खाद्य चांगलं आहे आणि जे तेल मिळतं, तेही खूप चांगलं आहे. पण हे वापरण्याचं प्रमाण खूप आहे. त्यामध्ये एक संतुलन असलं पाहिजे. हे संतुलन जर कायम ठेवलं, तर लगेच तुम्हाला काही वाटत नसलं, तरी ते 40 ते 45 व्या वर्षी जास्त जाणवतं, असा धोकाही डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केला आहे. आज ऑनलाइन काम आहेत, ताणतणाव आहेत आणि मोबाईलचा अतिवापर हेही धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हृदयासाठी चांगलं काय, यावर बोलताना डॉक्टर म्हणाले, मोसंबी, संत्री, खाण्यात डाळी आणि ड्रायफ्रूट्स, त्यामध्ये खजूर हे चांगले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हृदयामध्ये ब्लॉकेज का होतात आणि फक्त हृदयातच का, यावर बोलताना डॉक्टर म्हणाले, ब्लॉकेज हे सगळीकडे होऊ शकतात. ते फक्त हृदयातच होतात, हा गैरसमज आहे. हृदय कायम चालू असतं, म्हणून ते जास्त प्रमाणात तिथे होतात, असंही डॉक्टर यावेळी म्हणाले आहेत.
