Pune Footpath : ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Pune) पुण्यातील विमाननगर परिसरात पादचारी सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या वर्दळीच्या मार्गावर सलग आणि सुरक्षित पदपथ नसल्याने नर्सरीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शिस्तीत आणि सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी त्यांना चक्क दोरीच्या आधाराने नेण्याची वेळ आल्याचे चित्र समोर आले आहे.
या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, पादचाऱ्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वाहतुकीच्या मार्गातूनच वाट काढावी लागते. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला असून, शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात पायाभूत सुविधांचा विकास होत असताना चिमुकल्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी पदपथही उपलब्ध नसणे, ही गंभीर बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी म्हटले आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! तब्बल 150 मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश नाही
पुण्याची ओळख ‘पूर्वेचे ऑक्सफोर्ड’ अशी असली तरी पादचारी सुरक्षेच्या या परिस्थितीमुळे या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पदपथ नसल्याने केवळ नागरिकांची गैरसोय होत नाही, तर भरधाव वाहनांच्या वर्दळीत लहान मुलांसह सर्वसामान्य पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासात पादचारी सुविधांना प्राधान्य देण्याची गरज या प्रकारातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गाची तातडीने पाहणी करून सुरक्षित, सलग आणि अडथळामुक्त पदपथाची व्यवस्था करावी, अशी मागणी सुहास विजय टिंगरे यांनी केली आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पुणे शहराची ओळख केवळ विकासासाठी नव्हे, तर सुरक्षित पादचारी सुविधा असलेल्या शहरासाठीही निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
