पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दत्तात्रय सावंतांची नवी राजकीय खेळी; महायुती की मविआ?
Pune Graduate Constituency Election : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दत्तात्रय सावंत यांचा अचानक मोठा निर्णय
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या (Pune) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सोलापूर येथील शिक्षक मेळाव्यात जाहीर केले. मात्र, कोणत्या पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरायचे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. भाजपसह महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे सावंत यांनी सांगितल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात इच्छुकांकडून शिक्षकांशी संपर्क आणि संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. सावंत यांनी यापूर्वी 2014 मध्ये अपक्ष म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तर 2020 च्या निवडणुकीत त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता.
वेळ आली तर दोन्ही जागा लढणार! पुणे पदवीधर अन् शिक्षकबाबत मंत्री गोरेंचं मोठं वक्तव्य
2020 च्या निवडणुकीत सावंत यांना 12800 प्रथम पसंतीची मते मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी संपर्क कायम ठेवला असून, शिक्षकांच्या आग्रहामुळे यावेळी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणता पर्याय ते स्वीकारतात, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, सोलापूरमधील मेळाव्यात सावंत यांनी शिक्षक मतदार यादीतील कथित बोगस नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला. 2020 मध्ये कात्रज येथे शिक्षक नसलेल्या 5000 जणांची बोगस नोंदणी झाल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय यावेळीही सुमारे 3000 संशयित नोंदणी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक मतदारसंघातील बोगस नोंदणी खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.