प्रियंका गांधींना संधी देताना काँग्रेसने काय केलं? महिलांच्या प्रतिनिधित्वावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल

राहुल गांधी महिलांच्या हक्कांबाबत केंद्र सरकारवर टीका करत असून, महिलांना करिअरमध्ये पुरेशा संधी दिल्या जात नसल्याचा दावा करत आहेत.

News Photo   2026 08 31T175443.699

प्रियंका गांधींना संधी देताना काँग्रेसने काय केलं? महिलांच्या प्रतिनिधित्वावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल

पुण्यात झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या (Bjp) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी महिलांच्या हक्कांबाबत केंद्र सरकारवर टीका करत असून, महिलांना करिअरमध्ये पुरेशा संधी दिल्या जात नसल्याचा दावा करत आहेत. तसंच देशात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचंही ते सांगत आहेत. मात्र, महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे, असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी काँग्रेसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या देशाच्या मातृसत्तेचे सर्वात मोठं प्रतीक ‘वंदे मातरम्’ असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी फाशी स्वीकारतानाही ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला, याची आठवण त्यांनी करून दिली. महिलांच्या सन्मानाचा आणि अधिकारांचा मुद्दा काँग्रेसकडून मांडला जात असताना, प्रत्यक्ष राजकारणात महिलांना किती संधी दिली जाते, याचाही विचार करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यामुळं राहुल गांधींच्या महिला धोरणावरील वक्तव्यांना त्यांनी काँग्रेसच्या प्रत्यक्ष भूमिकेची जोड देत प्रत्युत्तर दिलं.

महिलांना राजकारणात अधिक संधी मिळायला हव्यात, असं काँग्रेसकडून सांगितलं जातं. मात्र, प्रियंका गांधी यांना राजकारणात संधी देण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेसने काय केलं?, असा थेट सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या मंत्रिमंडळात महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. एका बाजूला महिलांच्या राजकीय सहभागाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष सत्तेतील प्रतिनिधित्वाच्या वेळी वेगळी भूमिका घ्यायची, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा असल्याची टीका फडणवीसांनी केली.

राहुल गांधी तरुण मुलींना त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात बंड करण्याचं आवाहन करतात आणि भारत पितृसत्ताक देश असल्याचं सांगतात, असा आरोपही फडणवीसांनी केला. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधींनी महिलांच्या हक्कांबाबत केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी काँग्रेसच्या महिला धोरणालाच लक्ष्य केलं. महिलांच्या प्रश्नावर काँग्रेसने केवळ भाषणं न करता आपल्या पक्षातील आणि सत्तेतील महिलांच्या प्रतिनिधित्वाकडंही पाहावं, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

Exit mobile version