Sunetra Pawar : विस्तारत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे नियोजन करताना वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याच्या आव्हानांचा विचार करावा. शहरातील सर्व विकासकामे पारदर्शीपणे, निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला दिल्या. दर्जेदार आरोग्य सुविधा, प्रदूषण नियंत्रण आणि स्थलांतरामुळे पायाभूत सुविधांवर ताण वाढत आहे, याकडेही लक्ष देण्यास त्यांनी सांगितले.
महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठकीत शहरातील विविध प्रकल्प आणि नागरी सुविधांची माहिती दिली. पाणीपुरवठा, वाहतूक, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण निर्मूलनाच्या विषयांवरही चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले.
‘दादांचे शहराशी जिव्हाळ्याचे नाते’
अजितदादा आणि पिंपरी-चिंचवडचे जिव्हाळ्याचे नाते होते. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीही अजित पवार यांचा शहराचे शिल्पकार असा उल्लेख केला होता. हे शहर औद्योगिक प्रगतीचे केंद्र व्हावे, असे दादांचे स्वप्न होते. देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनविण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला होता. या शहरासाठी मीही कष्ट घेईन, असेही पवार यांनी सांगितले. शहराचा विस्तार वेगाने होत असल्याने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
मोशी डेपोच्या कामाची माहिती
मोशी कचरा डेपोचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने बैठकीत दिल्याचे पवार यांनी सांगितले. शहरातील कचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेचा दर्जा कायम राखण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही प्रशासनाला सांगितल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
स्थलांतराचा नियोजनात विचार करा
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शहराकडे स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे पवार यांनी सांगितले. या लोकसंख्येचाही शहराच्या नियोजनात विचार करावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचना विचारात घेऊन काम करण्यासही सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.
टाटा धरणातून एक टीएमसी पाण्याचा पर्याय
शहरातील दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘‘पाणीप्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. टाटा धरणातून एक टीएमसी पाणी आणण्याची व्यवस्था झाली, तर शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. भामा-आसखेडचेही पाणी शहरात आणण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीपेक्षा भाजप नगरसेवकांचाच गराडा
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या महापालिका भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपच्या नगरसेवकांचाच गराडा अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या भेटीत राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजप नगरसेवकांचा वावरच अधिक ठळकपणे जाणवला.
दौऱ्यात राष्ट्रवादीचे बडे पदाधिकारी गैरहजर
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर अध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे यांची अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. मात्र, अनेक नेते लग्नाला गेले असल्यामुळे गैरहजर असल्याचे पवार यांनी सांगितले.
