जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवशी 9 छाप्यात 2.24 लाखांचा मुद्देमाल जप्त
Ahilyanagar Local Crime Branch : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम
Ahilyanagar Local Crime Branch : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम राबवत एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल २ लाख २४ हजार ७०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कशी झाली कारवाई?
जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सपोनि हरीष भोये, पोउपनि अनंत सालगुडे, विकास जाधव यांच्यासह पोलीस अंमलदारांची पाच विशेष पथके तयार करून कारवाईसाठी रवाना केली होती. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी या पथकांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि जुगाराशी संबंधित माहिती संकलित करून ९ ठिकाणी धडक छापेमारी केली.
पोलीस ठाणेनिहाय कारवाईचा तपशील:
श्रीरामपूर शहर: जुगारावर १ कारवाई करत तब्बल १,८१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; तर अवैध दारू प्रकरणी १ गुन्हा दाखल करून ५,१८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
पारनेर: अवैध दारू विक्रीवर १ कारवाई करून १४,१६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त.
पाथर्डी: अवैध दारू विक्रीप्रकरणी ३ गुन्हे दाखल करत १४,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कोतवाली: अवैध दारू प्रकरणी १ गुन्हा (८,००० रुपये मुद्देमाल) व जुगारावर १ कारवाई (१,०२० रुपये मुद्देमाल) असे दोन गुन्हे दाखल.
श्रीगोंदा: अवैध दारू विक्रीप्रकरणी १ गुन्हा दाखल करत १,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर राजवीर देओलशी लग्न करणार?
या सर्व कारवायांमध्ये मिळून २,२४,७०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.