लाठ्या, काठ्या आणून काँग्रेसने आंदोलनाला हिंसक वळण दिलं; पुणे भाजपचा दावा

Dheeraj Ghate: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता बेकायदा जमाव जमवून चिथावणीखोर वक्तव्ये सुरू केली.

Bjp Vs Congress

Bjp Vs Congress

Dheeraj Ghate ON Congress: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी टिपू सुलतानची तुलना केलीय. त्याविरोधात भाजपने राज्यभर आक्रमक भूमिका घेतलीय. पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर भाजप (BJP) व काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले आहेत. त्यात कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हिंसा कोणी भडकवली यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने भाजपच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हटले आहे. तर हिंसा घडविण्यामागे काँग्रेस कार्यकर्ते असल्याचा दावा पुणे भाजपने केलाय. याबाबत पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate ) यांनी निवेदन काढत काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय.

Video : कुंपणच शेत खातय! पोलीस खात्यातील खळबजनक बातमी, 14 लाखांची लाच

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी टिपू सुलतानची तुलना करणारे बेताल व अवमानकारक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या विधानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या सर्वांच्या भावना दुखावल्या असून, हे प्रक्षोभक विधान समाजात तेढ निर्माण करणारे आहे, अशी तक्रार आम्ही पर्वती पोलिस ठाण्यात शनिवारी नोंदवली.


मोठी बातमी : अहिल्यानगरमधील तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात? एटीएसची छापेमारी, अनेकांकडे चौकशी

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी दुपारी साडेबारा वाजता पुण्यातील काँग्रेस भवनासमोर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी पुणे पोलिसांची रीतसर परवानगीही घेतली होती. त्यानुसार, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व शहराध्यक्ष म्हणून माझ्यासहि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते शांततामय व सनदशीर मार्गाने आंदोलन करून हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत होते.

त्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता बेकायदा जमाव जमवून चिथावणीखोर वक्तव्ये सुरू केली. लांगुलचालनाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचे समर्थन काँग्रेस कार्यकर्ते करत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाठ्या, काठ्या, दगडांची जमवाजमव करून आंदोलनाला हिंसक वळण देण्याची तयारी केल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आंदोलन संपल्यानंतर महापौरांसह मी व सर्व पदाधिकारी आंदोलन स्थळापासून निघत असताना, काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनातून दगडफेक सुरू केली. त्यामध्ये भाजपचे काही कार्यकर्ते व आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार जखमी झाले. हा अतिशय गंभीर प्रकार असून, आम्ही त्याचा निषेध करतो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली चिथावणीखोर वक्तव्ये, जमविलेला बेकायदा जमाव आणि दगडफेकीविरोधात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती धीरज घाटे यांनी दिली.

Exit mobile version