Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा व पूजन कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त विजयकुमार वांबुरे, उत्तम गावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा श्रीराम मंदिराची प्रतिकृती केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील श्री गणेश व प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस असणार आहेत.
मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.
गणेश कारखान्यातील पराभवानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया, ‘प्रवरामध्ये सत्तांतर झाले तर…’
सजावट विभागात १०० कारागिर दिवस-रात्र सलग ७५ दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रीं चे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.