शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!
Rohit Pawar : राज्यातील मोठे प्रकल्प तसेच नव्याने येणारे प्रकल्प गुजरातला (Gujarat) नेण्याच्या कारणावरून विरोधक भाजप सरकारवर सातत्याने टीका करत असतात. याआधीही काही प्रकल्प गुजरातला नेण्यावरून राज्यातील आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी तुफान हल्ला चढविला होता. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
आमदार पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की बर्कशायर हाथवे (BerkShire Hathaway) ची उपकंपनी असलेल्या लुब्रीजोल कॉर्पोरेशनने (Lubrizol Corporation) 1 हजार 230 कोटींची गुंतवणूक असलेला जगातला सर्वात मोठा सीपीव्हीसी रेसीन प्लांट गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा केली आहे.
#Berkshire_Hathaway ची उपकंपनी असलेल्या #Lubrizol_Corporation ने १२३० कोटींची गुंतवणूक असलेला जगातला सर्वात मोठा CPVC रेसीन प्लांट गुजरात मध्ये उभारण्याची घोषणा केली आहे.
ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात गुंतवणूक देण्याकडे केंद्र सरकारचा असलेला कल बघता, महाराष्ट्रातील… pic.twitter.com/L4QHkIIMx9
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 21, 2023
ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात गुंतवणूक देण्याकडे केंद्र सरकारचा असलेला कल बघता राज्यातील आगामी निवडणुका विचारात घेता आपण प्रयत्न केले असते तर कदाचित तळोजामध्ये लुब्रीजोलचा प्लांट आणता आला असता. परंतु, कदाचित आपल्या राज्यात औरंगजेब, धार्मिक तणाव या गोष्टींनी काम भागू शकते याची खात्री राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्राला पटवून दिली असावी म्हणूनच केंद्राने निवडणुका असूनही महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले असावे. बर्कशायर हाथवेने दावोसमध्ये 16 हजार कोटींचा करार केला असल्याचे आपले सरकार सांगते किमान ती गुंतवणूक तरी प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य शासनाने मन लावून काम करायला हवे.
दरम्यान, याआधी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यावरुनही विरोधकांनी राज्य सरकारवर कठोर टीका केली होती. त्यानंतर आता नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येण्याऐवजी गुजरातला जात असल्याने आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या काराभारावर नाराजी व्यक्त केली.