Download App

पुण्यात अजित पवारच ‘दादा’; प्रशासकीय बैठकांचा धडाका : चंद्रकांत पाटील उरले नावालाच पालकमंत्री!

पुणे : शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकांचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. (DCM Ajit Pawar Pune Chandrakant Patil bjp guardian minister)

माझ्याकडे अर्थखाते दिले आहे. त्यात मी उपमुख्यमंत्रीसुद्धा आहे, त्यामुळे मला बैठका घेण्याचा, प्रकल्पांचा आढावा घेण्याचा आणि अर्थमंत्री म्हणून निधी वाटपाचा अधिकार आहे, असं म्हणतं अजित पवार यांनी बैठकांचा धडाका सुरु केला आहे. अजित पवारांच्या या धडाक्यामुळे पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्रिपद जरी आपल्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.

अजितदादांच्या ‘आवडत्या’ शहरात शरद पवारांचं अडलं गणित; शहराध्यक्षपदासाठी चेहराच मिळेना

पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, रखडलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्न याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर करत चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे.मागील आठवड्यात अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या व त्यांना काही सूचना केल्या. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हते.

बारामतीत अजित पवारांची फटकेबाजी; पण शरद पवार, सुप्रिया सुळेंवर शब्दही नाही

आज (28 ऑगस्ट) पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली आहे.या बैठकीला पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना आमंत्रण असले तरी बैठकीचे नेतृत्त्व अजित पवार करणार आहेत. अजित पवार यांच्या या बैठकांमुळे अधिकाऱ्यांचीही चांगलीच गोची झाली आहे. पुण्यातील कामांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनीही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. एकाच कामावरून दोन मंत्र्यांच्या सूचना आल्याने ऐकायचे तरी कोणाचे? अजितदादांचे ऐकायचे की चंद्रकांतदादांचे? असा सवाल अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

Tags

follow us