अजितदादांच्या ‘आवडत्या’ शहरात अडलं शरद पवारांचं गणित; शहराध्यक्षपदासाठी चेहराच मिळेना

अजितदादांच्या ‘आवडत्या’ शहरात अडलं शरद पवारांचं गणित; शहराध्यक्षपदासाठी चेहराच मिळेना

– विष्णू सानप

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. या काळात त्यांच्यासह 8 आमदार सत्तेत सहभागी झाले. शक्तिप्रदर्शन झाले, 40 आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा ठोकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत नवीन प्रदेश कार्यकारणी आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केली. (after two months of Ajit Pawar’s rebellion, a city president could not be appointed in Pimpri-Chinchwad.)

अजित पवार यांच्या दोन महिन्यातील या घडामोडींनी शरद पवार आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला. यानंतर पवार यांनीही अजितदादांसोबत गेलेल्या नेत्यांची हकालपट्टी करत त्यांच्यावर कारवाई केली. पुन्हा नवीन चेहऱ्यांची नियुक्ती केली. मात्र आता दोन महिन्यांनंतर काही प्रमुख शहरांमध्ये शरद पवार यांच्या गटाला शहराध्यक्ष देखील मिळणं अवघड झाले आहे. यात अजित पवार यांचे आवडते शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडचाही उल्लेख करावा लागतो.

‘प्रत्येकाचा काळ असतो, तो ओळखला पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे’

पिंपरी चिंचवडमधील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडली, त्यामुळे पवारांना शहराध्यक्ष मिळणे देखील अवघड झाले आहे. अजित पवारांच्या बंडाला सुमारे दोन महिने होत आले तरी देखील पिंपरी-चिंचवडमध्ये पवारांना शहराध्यक्ष अद्यापही नियुक्त करता आला नाही.अर्थात तसा चेहराही उरलेला नाही. जे पवारांसोबत असल्याचं सांगतात ते देखील अजित पवारांच्या मेळाव्याला उपस्थिती लावून संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते भांबावलेले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 36 माजी नगरसेवकांनी पवारांची साथ सोडत अजित पवार गटांमध्ये दाखल झाले. यात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील हाच कित्ता गिरवला. यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून गव्हाणेंवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे गव्हाणेंनंतर दुसरा शहराध्यक्ष नेमणे अपेक्षित होते. मात्र अजित पवार गटाला टक्कर देईल, असा कुठलाही चेहरा पवारांना सापडत नसल्याने शहराध्यक्षाची नियुक्ती रखडल्याची चर्चा आहे.

बारामतीत अजित पवारांची फटकेबाजी; पण शरद पवार, सुप्रिया सुळेंवर शब्दही नाही

शरद पवार गटाकडून शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार विलास लांडे, अरुण बोराडे, काशिनाथ जगताप, जालिंदर शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. यात विलास लांडे हे नाव मोठं आहे. मात्र त्यांनीही अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. नुकतेच त्यांनी अजित पवार यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित लावली होती. त्यामुळे ते दोन्ही दगडावर पाय ठेवून असल्याचे चित्र आहे.दरम्यान, शरद पवार गटाची संपूर्ण मदार ही नवख्या कार्यकर्त्यांवर आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, नवनियुक्त मुख्य प्रवक्ते माधव पाटील व अन्य दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांवर आहे.

दुसरीकडे अजित पवारांचे आवडते शहर आणि पिंपरी चिंचवडच्या शहराच्या विकासामध्ये मोठा वाटा असलेल्या अजित पवारांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शरद पवार गटातील कुणी दंड थोपाटेल, अशी शक्यताही कमीच आहे. त्यामुळे शरद पवारांपुढे पिंपरी-चिंचवडचे गणित सोडविणे अवघड होऊन बसले आहे. आता पुढील काळात पवारांचा किल्ला कोण लढवणार? आणि हे अवघड शिवधनुष्य कोण पेलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube