Ajit Pawar on CM Post : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या (Amit Shah) मुंबई दौऱ्यात अजित पवार यांनी (Ajit Pawar) निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी माझं नाव जाहीर करा असा प्रस्ताव ठेवल्याची बातमी समोर आली होती. आज सकाळपासून याचीच चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. निवडणुकीआधीच (Maharashtra Elections) अजित पवार यांनी अशी मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आता मात्र स्वतः अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. द हिंदू या दैनिकात आलेली ही बातमी धादांत खोटी आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत माझी अमित शाहांबरोबर कोणतीच चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी आज पुण्यात (Pune News) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत महायुतीची रणनीती काय असेल याची माहिती दिली. तसेच मी अमित शाहांकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. आम्ही मुंबई विमानतळावर अमित शाहा यांची भेट घेतली होती. परंतु, मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांच्याशी कोणतीच चर्चा झाली नाही.
बिहार पॅटर्न राबवा, CM पदी माझं नाव जाहीर करा; अजितदादांचा शाहांना प्रस्ताव?
अजित पवार यांनी तर एक महत्वाचा (Ajit Pawar) प्रस्ताव अमित शाहांसमोर मांडल्याची चर्चा होती. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिला. निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीने माझे नाव जाहीर करावे असे त्यांनी अमित शाहांना सांगितले. द हिंदू (The Hindu) या इंग्रजी दैनिकाने अशी बातमी दिली होती. परंतु, या बातमीत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट करत अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
राज्यातील 288 मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे. बऱ्याच जागांबाबत एकमत झालं आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं, कोणत्या पक्षाला मतदारसंघ सोडायचा याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर माहिती देऊ असे अजित पवार म्हणाले. सध्या आमचं लक्ष राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे उद्दीष्ट आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.