Download App

संग्राम थोपटेंचं विधानसभा अध्यक्षपद कोणी अडवलं होतं? काँग्रेसच्या बाकावरुन थेट अजितदादांकडे बोट

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडा घातला होता का? असा सवाल आता विचारला जात आहे. याचं कारण ठरलं ते आज (3 ऑगस्ट) सभागृहात घडलेला एक प्रसंग. विधानसभेतील या प्रसंगाच्या निमित्ताने संग्राम थोपटे यांच्या हुकलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या जखमेवरील खपलीही पुन्हा एकदा निघाली आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar had opposed the appointment of Bhor’s Congress MLA Sangram Thopte as the Assembly Speaker in the Mahavikas Aghadi government)

नेमकं सभागृहात काय घडलं?

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar) यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. याच अभिनंदनाच्या भाषणात थोपटे यांच्याशी संबंधित एक प्रसंग घडला.

सत्यजीत तांबेंना न्याय दिला… देवेंद्र फडणवीसांची नजर आता संग्राम थोपटेंवर!

वडेट्टीवर यांच्यापूर्वी विरोधी पक्ष नेते म्हणून संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. त्यासाठी थोपटेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र पाठवलं असल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र अखेरच्या क्षणी विरोधी पक्ष नेतेपदाची माळ वडेट्टीवार यांच्या गळ्यात पडली. यापूर्वी महाविकास आघाडी सरकरामध्ये नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांच्या जागी थोपटे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेरपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. याच सर्व घडामोडींचा संदर्भ घेत फडणवीस यांनी सभागृहात टोलेबाजी केली.

फडणवीस म्हणाले, सकाळी आज उल्लेख झाला, हे खरंय की वडेट्टीवार यांचं नाव घोषित करता करता उशीर झाला. पण आता आमच्या संग्राम भाऊच नेमकं काय होणार आहे मला माहित नाही. त्यांचं नेहमी असं का होतं? मागच्या वेळेस नानाभाऊंनी अध्यक्ष पद सोडून दिलं. त्यानंतर आम्ही शेवटपर्यंत ऐकत होतो संग्राम भाऊ होणार.. संग्राम भाऊंचे नाव येणार, संग्राम भाऊंची चिठ्ठी झाली आहे, चिठ्ठी निघालेली आहे, चिट्ठीवर सही झालेली आहे, चिठ्ठी दिल्लीहून डिस्पॅच झाली आहे, डिस्पॅच होता होता कुठे अडते? पण ती नाही झाली हे उत्तमच आहे.

Monsoon Session : नंबर एक अन् नंबर दोनचा उपमुख्यमंत्री कोण? जयंत पाटलांची शिंदेंना गुगली!

फडणवीस यांच्या याच सवालानंतर काँग्रेसच्या बाकावरुन शेजारीच बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने बोट दाखवत, शेजारी बसलेल्यांना विचारा कुठे अडलं होतं, असा टोमणा मारला. त्यावर फडणवीस यांना सावरुन घेत, ते कसे ठरवणार? तुमच्या पक्षाचे निर्णय ते थोडी घेतात? ते नाहीत घेत तुमच्या पक्षाचे निर्णय असं स्पष्ट केलं. मात्र खुद्द काँग्रेसच्याच बाकावरुन अजितदादांकडे बोट दाखविलं गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

देवेंद्र फडणवीसांची नजर आता संग्राम थोपटेंवर?

यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, पण शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही (काँग्रेस) ठरवा न्याय देणार आहात का? अन्यथा आम्ही देऊ, असं म्हणतं फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी निमंत्रण दिले. त्यामुळे आता फडणवीस यांची थोपटे यांच्यावर नजर आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us