कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे: दिलीप वळसे पाटील

 Dilip Walse Patil : राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या

 Dilip Walse Patil

 Dilip Walse Patil

Dilip Walse Patil : राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना जाहीर चर्चेचे खुले आमंत्रण दिले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, सुधारणांसाठी आंदोलकांशी चर्चा करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलन संपवून आंदोलक आपल्याकडे आले, तर त्यांचे आदरातिथ्य करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असे सांगत वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये योग्य त्या सुधारणा नक्कीच करता येऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अगदी त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले, तरीही मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तिथे येण्यास आपण तयार असल्याचे सांगत, या प्रयत्नांमध्ये आपला कोणताही स्वार्थ नसून शेतकऱ्यांचे हित हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कांदा उत्पादक आणि साखर उद्योगाच्या अडचणींवर केंद्र पातळीवरून वेगाने हालचाली सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान आणि पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत छगन भुजबळ, दादा भुसे, जयकुमार रावल आणि स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी कांदा प्रश्ना संदर्भातील सद्यस्थिती आणि दाहकता केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले असून, येत्या पुढील १० दिवसांत या संदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. या आश्वासनाच्या अनुषंगाने आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून असून, या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेणार असल्याची घोषणाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली. या आगामी भेटीदरम्यान, वळसे पाटील हे शरद पवार यांना दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीतील सविस्तर चर्चेची माहिती देणार असून, केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार साहेबांनी देखील त्यांच्या पातळीवर केंद्र सरकारकडे वजन वापरावे आणि हा विषय लावून धरावा, अशी विनंती ते या भेटीत करणार आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजाचा दाखला देत दिलीप वळसे पाटील यांनी आगामी काळातील नैसर्गिक व आर्थिक आव्हानांकडेही लक्ष वेधले. येत्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाची संभाव्यता कमी असून साधारणतः ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, शेतकरी बांधवांनी ऊस, कांदा किंवा इतर नगदी पिकांचे नियोजन करताना या सर्व हवामान बदलांचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या जागतिक युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून यामुळे महागाई आणि आर्थिक मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, जेव्हा जेव्हा देशात आर्थिक मंदी येते, तेव्हा कृषी क्षेत्रच देशाच्या आर्थिक विकासाला खरा हातभार लावून देशाला सावरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना, शेतकरी राजा स्वतः परिस्थिती जाणत असल्याने त्याला सल्ला देण्याची गरज नाही, परंतु शेतकरी हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, असे सांगत आंदोलकांनी सकारात्मक चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

Exit mobile version