Dilip Walse Patil Vs Ashok Pawar: शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीची (Shirur APMC Election) निवडणूक जोरदार गाजत आहे. कारण माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शिरुरचे आमदार अशोक पवार ( Ashok Pawar) हे दोघे आमने-सामने आलेत. आमदारकीला पराभूत झाल्यानंतर अशोक पवार यांना स्थानिक निवडणुकीत धक्के बसतायत. अशोक पवार यांच्या ताब्यात पुन्हा बाजार समिती जावू नये म्हणून महायुतीच्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावलीय. तर अशोक पवार यांनी भाजपचे जुने काही जण आपल्या बाजूला करत जोरदार फाईट देण्याची रणनिती आखलीय.
आमदार असताना अशोक पवार यांच्या ताब्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात होती. त्यानंतर 2022 ला बाजार समितीवर प्रशासक आला. गेल्या चार वर्षांपासून बाजार समिती प्रशासकराज आहे. या बाजार समितीसाठी 5 जुलै रोजी 18 जागांसाठी निवडणूक होत आहे. बाजार समितीवरील वर्चस्वासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना पुरस्कृत ‘महायुती शेतकरी विकास पॅनेल’; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत ‘स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल’ यांच्यात सरळ लढत होतोय. स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल नेतृत्व माजी आमदार अशोक पवार, जयश्री पलांडे, राहुल पाचर्णे हे करत आहेत. तर महायुती शेतकी विकास पॅनेलचे नेतृत्व माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, मंगलदास बांदल हे करित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शिरूरचे आमदार अशोक पवार हे शरद पवारांबरोबर राहिले. त्यानंतर मात्र अशोक पवार यांना अनेक राजकीय धक्के सहन करावे लागतायत. ते विधानसभेला पराभूत झाले. शिरूर नगरपालिकेमध्ये पाचच नगरसेवक निवडून आलेत. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ते अपयशी ठरले. केवळ स्वतः वडगाव-मांडवगण गटातून त्यांची पत्नी विजयी झाल्या आहेत. सध्या घोडगंगा सहकारी साखर कारखाना त्यांचा ताब्यात आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे तो बंद आहे.
थेट आरोप-प्रत्यारोप
शिरुरचे आमदार माऊली कटके यांच्यावर अशोक पवार यांच्या पॅनेलकडून राजकीय आरोप केले जात आहे. कटके हे तालुक्यात फिरकत नाहीत, फक्त निवडणूका आल्या की उगवतात, दीड वर्षांत कुठलीही विकासकामे झाली नाहीत, त्यांना शेतीच्या पाण्याचे नियोजन जमले नसल्याच्या आरोपांची राळ पवार गटाकडून सुरू आहे. तर महायुतीच्या नेत्यांनी घोडगंगा साखर कारखान्यावर अशोक पवार यांना घेरले आहे. तालुक्यातील सहकार अशोक पवारांनी घरातच जिरविल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी लावून धरला आहे. तर पवार यांच्याकडून बाहुबली, पैसेवाले उमेदवार दिल्याचा आरोप केला जात आहे.
दिलीप वळसेंनी पवारांना घेरले
शिरुर तालुक्यातील 42 गावे ही दिलीप वळसे यांच्या विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे वळसे पाटील यांनीही या निवडणुकीत लक्ष घातलेले आहेत. त्यांनी अशोक पवार यांना घेरले आहे. घोडगंगा आणि जिल्हा बँकेला मदत केली ती आमची चूक झाली असल्याचे वळसे पाटील एका सभेत म्हणाले आहेत. 42 गावात मतांची आघाडी मिळाली मिळून घोडगंगाचा पॅनेल विजय झाला. ती आमची चूक होती. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार दिला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक 52 मते मिळवून देऊन जिल्हा बँकेचे संचालक केले, असा दावा वळसे पाटलांनी केला आहे. तर अशोक पवार यांनी विरोधकांवर धनदांडगे उमेदवार दिल्याचा आरोप करत ही निवडणूक शेतकरी विरुद्ध धनदांडगे असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता शिरुर बाजार समिती कुणाचा ताब्यात जाते हे रविवारी 5 जुलैला स्पष्ट होईल.
