पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) मदत केल्याप्रकरणी येरवडा कारागृहाच्या डॉक्टरलाच अटक करण्यात आली आहे. येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी संजय मरसाळे यांना अटक केली आहे. किरकोळ कारणासाठीही ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्याची शिफारस मरसाळेंनी केली होती, अशी माहिती चौकशीत समोर आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी हेच कैद्याला ससूनला (Sassoon Hospital) रेफर करतात. (doctor of Yerwada Jail has been arrested for helping drug mafia Lalit Patil.)
ललित पाटील प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी ससून रुग्णलयातील महेंद्र शेवते या कर्मचाऱ्याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. शेवते हा कारागृहातून रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची बडदास्त करत होता. याआधीही या प्रकरणात प्रशासनातील अनेक बड्या नावांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. काहींना अटकही केली आहे. यात ससूनचे मुख्य अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यापासून ते दोन पोलीस कॉन्स्टेबसह दहा पोलिसांचा समावेश आहे.
ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पळून गेला होता. त्यानंतर मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. न्यायालयाच्या परवानगीने ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या नाशिक येथील घराची झडती घेतली असता कोट्यावधी रुपयांचे सोने आढळले होते.
या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी दोषी असून त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई झाली नाही असे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले होते. राज्य सरकारसह पोलिसांच्या विरोधात पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा धंगेकर यांनी दिला होता. त्यानंतर ससूनमधील डॉ. ठाकूर आणि ससूनचे डॉ. प्रविण देवकाते यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. तर आतापर्यंत दोन पोलीस कॉन्स्टेबसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ललित पाटीलवर पुण्यातील ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, कैदी असतानादेखील ललितला ससून रूग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पाटील लाखो रूपये खर्च करत असे. यानंतर आता ऐशोआरामासाठी ललित पाटील खर्च करत असलेला आकडा समोर आला आहे.