उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे (Pune) दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या घरी झालेल्या अनपेक्षित भेटीने राजकीय चर्चांना वेग आला आहे. भीमाशंकरचा दौरा आटोपून परतताना शिंदे यांनी अचानक आंबेगावकडे आपला ताफा वळवला आणि आढळरावांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली. नियोजित दौऱ्यात या भेटीचा समावेश नसल्याने या भेटीमागील राजकीय कारणांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
आढळराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही काळ चर्चा झाल्याची माहिती आहे. भेटीनंतर आढळरावांनी सोशल मीडियावर शिंदेंबद्दल भावना व्यक्त करताना ‘क्षण आनंदाचा, क्षण जिव्हाळ्याचा’ अशी प्रतिक्रिया दिली. शिंदे यांचं नेतृत्व आणि त्यांची आपुलकी आपल्याला कायम ऊर्जा देत राहील, असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे या भेटीला केवळ सदिच्छा भेटीपेक्षा अधिक राजकीय महत्व आहे का, याबाबत चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवली, शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद
शिवसेनेतील फुटीनंतर आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून शिरूरमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आढळरावांची सक्रिय राजकारणातील उपस्थिती काहीशी कमी झाल्याचं चित्र होतं. मात्र, शिंदे यांनी अचानक त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने ते पुन्हा पुणे जिल्ह्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महायुतीत असल्याने या भेटीमागे आगामी राजकीय समीकरणांचा काही संदर्भ आहे का, याकडे आता पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
