Sasoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
रोहीत पवार यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले आहे की, गेल्या अधिवेशनात मी पुण्यातील ‘ड्रग्स रॅकेट’ संदर्भात लक्षवेधी उपस्थित करून तब्बल 20 मिनिटे चर्चा घडवून आणली होती. उडता पंजाब प्रमाणे उडता पुणे, उडता महाराष्ट्र म्हणण्याची वेळ येईल, असा संभाव्य धोकाही बोलून दाखवला होता. लक्षवेधीत गृहमंत्र्यांनी अतिशय समर्पक असे उत्तर दिले होते त्या उत्तराने मी स्वतः सुद्धा काही प्रमाणत समाधानी झालो होतो.
लोकसभा निवडणूक : शरद पवारांचे चार उमेदवार ठरलेच
परंतु आज पुण्यातली सर्व घटना बघता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ड्रग पेडलर आरोपीच्या बचावासाठी मंत्री फोन करण्याची तसेच ड्रग्सच्या धंद्यात मंत्र्यांची भागीदारी या सर्व चर्चा ऐकता अतिशय वाईट वाटतं आणि संतापही येतो. मोठी नावे उघड होण्याची भीती असल्याने ललित पाटीलच्या जीवाला धोका असल्याच्या चर्चाही ऐकण्यात येत आहेत. हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? आज प्रश्न एक युवा म्हणून पडला, असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
ड्रग्ज प्रकरणात संबंध आढळला तर राजकारण सोडेन, खोटारडे आरोप खपवून घेणार नाही; दादा भुसेंचा इशारा
दरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या घटनेला 15 दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागत नव्हता. मात्र, आज ललित पाटील याला गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली आहे. यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आले आहे. येरवडा कारागृहात कैद असलेल्या शुभम पास्ते या कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात होते. सुनावणी झाल्यानंतर पुन्हा कारागृहात आणले जात होते. त्याच वेळेला त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आले आहे.