लोकसभा निवडणूक : शरद पवारांचे चार उमेदवार ठरलेच

  • Written By: Published:
लोकसभा निवडणूक : शरद पवारांचे चार उमेदवार ठरलेच

प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी)
मुंबई : देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) जोरदार हालचाली सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सर्व लोकसभा मतदार संघाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आढावा सुरू आहे. या बैठकीत नवीन उमेदवारांचा शोध आणि शिवसेनेसोबत जागावाटप अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे.

गरबा खेळायला जाताय तर सावधान… पोलिसांनी केले महत्वाचे आवाहन 

शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेसाठी आढावा बैठक सुरू आहे. दोन दिवस ही आढावा बैठक होणार आहे. आज झालेल्या बैठकीत कोल्हापूर हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर सातारा आणि माढा अशा सात मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तर उद्या होणाऱ्या बैठकीत दिंडोरी, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बिड, भिवंडी आणि जालना अशा लोकसाभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना पक्षाने आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत पक्षाने सर्वच ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देखील निश्चित केली होती. एवढंच काय तर त्या उमेदवारांनी निवडणुकीच्या बांधणीसाठी आपापल्या मतदारसंघात जोरदार तयारी देखील सुरु केली होती. असं असतांना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सर्वच ज्येष्ठ आणि मातब्बर नेते हे अजित पवार यांच्या सोबत गेले. त्यामुळं या मतदारसंघात आता लोकसभेसाठी नवा उमेदवार शोधणं एक मोठं आव्हान आहे. अजित पवार यांच्यासह जेष्ठ नेते पक्ष सोडून गेल्यानंतर त्या ठिकाणी कोण उमेदवार देता येईल, याची चाचपणी शरद पवार गटाकडून करण्यात आली.

यात बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे हे उमेदवार असतील हे निश्तिच आहे. तर साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रकृती पाहता या ठिकाणी शशिकांत शिंदे यांच्या नावाची देखील अनेकांनी शिफारस केली आहे. हातकणंगले मतदारसंघासाठी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक जयंत पाटील यांचे देखील नाव चर्चेत आलं आहे. रावेर लोकसभा मतदार संघासाठी एकनाथ खडसे यांचे नाव सर्वानुमते घेण्यात आले आहे. कोल्हापूर आणि माढा मतदारसंघासाठी काही नावांवर पुन्हा चर्चा करावी, असं ठरल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

महाआघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील सहभागी आहे. गेल्या निवडणुकीत अनेक मतदार संघात शिवसेना विजयी झाली आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा मतदार संघांपैकी काही मतदार संघामध्ये अदलाबदल करावी लागणार आहे. त्यामुळे आताच त्या मतदार संघात बलाढ्य उमेदवार गळाला लागेल का याचीही चाचपणी केली गेल्याची माहिती आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघाचा आढावा घेतला, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाचा आढाव घेतला आहे. आता उमेदवार चाचपणी आणि पक्षाची ताकद अशा मुद्द्यावर लवकरच महाघाडीच्या पक्षाची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर कुठला मतदार संघ कुणाला मिळेल? कुठला उमेदवार कुठे फिट बसेल? हे लवकर समजेल.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube