गरबा खेळायला जाताय तर सावधान… पोलिसांनी केले महत्वाचे आवाहन
Dandiya Raas Garba : अहमदनगर शहरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोतवाली हद्दीत होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्र्वभूमिवर आयोजकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेऊन काही समस्या सांगितल्या. पोलिसांकडून सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन यादव यांनी दिले. गरब्याच्या ठिकाणी कोणीही हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षक यादव यांना काही अडचणी सांगितल्या. सर्व अडचणी सोडविण्यात येतील, असे यादव यांनी सांगितले.
नेत्यांच्या सभा सगळ्या उत्तरेकडेच का? राम शिंदे यांचा मंचावरच विखे पाटलांना सवाल
त्यासोबतच गरबा कार्यक्रमाच्याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावावी, पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात यावी, अशा काही सूचना केल्या. तसेच, गर्दीचा फायदा घेऊन काही हुल्लडबाज महिला, मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करतात, असा प्रकार घडल्यास तत्काळ कोतवाली पोलिसांना माहिती द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे यादव यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित होते.
११२ ला माहिती द्या…
गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरीला जाण्याची शक्यता असते, तसेच गरबा कार्यक्रमावेळी महिला किमती दागिने, वस्तू सोबत आणतात. याचा फायदा घेऊन चोरटे हातचलाखीने चोरी करतात. असा प्रकार घडल्यास तत्काळ कोतवाली पोलिस किंवा डायल ११२ ला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले आहे.