निळवंडेच्या पाण्याचं PM मोदींचा हस्ते लोकार्पण : विखे-पाटलांनी 11 महिन्यांपूर्वीच रोवली होती मुहुर्तमेढ
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबर रोजी अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील निळवंडे धरणाचा लोकार्पण सोहळा, शिर्डी देवस्थानमधील दर्शन रांगेचा प्रारंभ, रुग्णालयाचा समारंभ, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विभागाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम नियोजित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. (Prime Minister Narendra Modi is visiting Ahmednagar on October 26)
दरम्यान, मोदी यांच्या नगर दौऱ्याची मुहुर्तमेढ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी डिसेंबर 2022 मध्येच रोवली होती. त्यावेळी सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना शैक्षणिक संकूल, शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण आणि निळवंडे धरणाच्या उद्धघाटनासाठी निमंत्रण दिले होते. त्यावर मोदी यांनीही निमंत्रण स्वीकारले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले होते.
ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्या अनेकांची तोंड बंद होणार; फडणवीसांचा इशारा
त्यानंतर जून महिन्यात “आता सध्या फक्त चाचणी झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कालव्यांचे अधिकृत उद्घाटन होणार आहे” असं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आता त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाचे लोकार्पण होणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांचा हा दौरा विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी असला, तरी यातून राज्यातील लोकसभेच्या अनेक गणितांवर खलबतं होण्याची शक्यता आहे.
मोदी अन् विखे पाटलांमधील ‘हॉटलाईन’ पुन्हा चर्चेत :
विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने एक तक्रार केली जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळच मिळत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांचा असा सुर असतानाच भाजपमधील जुन्याजाणत्या आणि वरिष्ठ नेत्यांनाही काहीसा असाच अनुभव येतो. पण 4 वर्षांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतीत मात्र हा अनुभव काहीसा वेगळा आहे. मागील 4 वर्षांच्या काळात अनेकदा विखे पाटील आणि दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या यात मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत.
Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! निळवंडेसाठी तब्बल 450 कोटींची तरतूद
सप्टेंबर 2021 मध्ये तर राधाकृष्ण विखे पाटील यांना महिन्याभरात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची दोन वेळा वेळ मिळाली होती. यात एकदा ते सहकुटुंब भेटले होते तर एकदा शिर्डी आयटी पार्कच्या कामासंदर्भात भेट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोरोनामध्ये पंतप्रधान मोदींचा दौरा शक्य नव्हता तर ऑनलाईन स्वरुपात विखे पाटील यांनी त्यांची वेळ मिळवली होती. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते झालं होते. एकदा तर गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची वेळ तेव्हाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळू शकली नव्हती. पण विखे पाटील यांना मिळाली होती. यामुळे विखे पाटील यांचे आणि केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे थेट संपर्क असल्याचे बोलले जाते.
सुजय विखे पाटीलही वडिलांच्या पावलावर :
जी गोष्ट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबतीत तेच गोष्ट आता त्यांच्या सुपुत्र आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्याबाबतीत होताना दिसत आहे. सुजय विखे पाटील आणि पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शाह यांच्या भेटीचेही फोटो अनेकदा व्हायरल झालेले आहेत. विखे पाटील यांना दिल्लीतील भाजपमध्ये मिळणाऱ्या या ‘स्पेशल ट्रिटमेंट’ची राज्यातील भाजपमध्ये मात्र दबक्या आवाजात वेगळीच चर्चा चालू असते. विखे-पाटील यांना भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांची भेट मिळत असल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ राज्य भाजपच्या राजकारणात काढले जातात.