पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय (Pune) तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आंदोलन प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह 25 जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात विनापरवानगी प्रवेश, प्राचार्यांच्या कार्यालयात गोंधळ घालणे आणि धमकी दिल्याच्या आरोपांवरून सोमवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. भारतीय न्याय संहितेतील कलम 329, 189, 46, 221 आणि 351 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अमित ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेले होते. हॉस्टेलमधील अस्वच्छता आणि कॅन्टीनमधील निकृष्ट जेवणाबाबत विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर तक्रारी मांडल्या. त्यानंतर अमित ठाकरे यांनी कॅन्टीनची पाहणी केली असता तेथे सडलेले कांदे आढळून आले. हे कांदे घेऊन अमित ठाकरे आणि मनविसेचे कार्यकर्ते प्राचार्यांच्या कार्यालयात गेल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. अमित ठाकरे यांनी हा फोटो काढण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला. प्राचार्य डॉ. राजेंद्र काशिराम पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अमित ठाकरे पूर्वपरवानगीशिवाय महाविद्यालयात आल्याचा आणि मेस तसेच स्वच्छतागृहाच्या अवस्थेबाबत जाब विचारल्याचा उल्लेख केला आहे.
फोटो काढण्यास विरोध केल्यानंतर उद्धटपणे वागणूक देत घोषणाबाजी करण्यात आली तसेच आठ दिवसांत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्राचार्यांनी केला आहे. या जबाबाच्या आधारे अमित ठाकरे यांच्यासह मनविसेच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे पुण्यातील या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळाले आहे.
