पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ANTFची मोठी कारवाई; MD ड्रग्ससह 3 जणांना अटक
ANTF Arrests 3 in Pune Drug Bust पुण्यात ANTFची मोठी कारवाई; MD ड्रग्जसह 3 जणांना अटक, मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त.
ANTF Arrests 3 in Pune Drug Bust, Seizes MD : महाराष्ट्रात अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कृती दलाने (ANTF) पुण्यात मोठी कारवाई करत MD (मेफेड्रोन) या अंमली पदार्थासह तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत MDसह मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
सोनिया गांधींचे आत्मचरित्र भारतात प्रकाशित करण्यापासून पेंग्विनची माघार; संपादकीय बदलांवरून वाद
पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. 26 जून 2026 रोजी पोलिसांनी 98 ग्रॅम MD जप्त करत तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर तपास पुढे नेताना या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. आर्थिक व्यवहार, आरोपींचे संपर्क आणि अंमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या साखळीचा तपास केल्यानंतर ANTF पथकाने पुढील कारवाई केली.
आरोपींकडून MD, मोबाईल आणि लॅपटॉप जप्त
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विक्रम कळीकर (30) याचा समावेश आहे. तो रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
दुसरा आरोपी शिवस सदिदाव उर्फ अॅलेक्स (30) हा मूळचा सांगलीचा असून सध्या डोंबिवली, ठाणे येथे राहत होता. त्याच्याकडून 22 ग्रॅम MD, आठ मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
तर तिसरा आरोपी जली विल्यम्सक (30) हा मूळचा किंगडम ऑफ इस्वितिनीचा नागरिक असून सध्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राहत असल्याची माहिती आहे. त्याच्याकडून 14 ग्रॅम MD जप्त करण्यात आले.
आर्थिक व्यवहारांच्या तपासातून धागेदोरे
या प्रकरणाच्या तपासादरम्यान ANTF पथकाने आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचीही माहिती घेतली. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि पुरवठ्याच्या मार्गाचा तपास करण्यात आला. या तपासातून अंमली पदार्थांच्या पुरवठ्याशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जयकुमार गोरेंना मोठा धक्का! भाऊ शेखर गोरे 1 सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
आरोपींचे स्थानिक तसेच परदेशातील संपर्क आहेत का, अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.
परदेशी नागरिकाच्या सहभागामुळे तपासाला महत्त्व
या प्रकरणातील एका आरोपीचा परदेशी नागरिक असल्याने तपासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्यक्तीचा अंमली पदार्थांच्या व्यवहाराशी नेमका काय संबंध आहे, त्याचे इतर आरोपींशी संबंध कसे होते आणि या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास ANTFकडून करण्यात येत आहे.
‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
केंद्रीय गृहमंत्र्यांनी 2029 पर्यंत ‘नशामुक्त भारत’ करण्याचा संकल्प मांडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बेकायदेशीर अंमली पदार्थांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर निर्देश दिले आहेत. त्यानुसार ANTFकडून अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे.
नेपाळनंतर आता चीनही हादरलं, भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नक्की काय घडलं?
पुण्यातील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असून, अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
माहिती देण्याचे ANTFचे आवाहन
अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवनाबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी अंमली पदार्थ विरोधी कृती दलाशी (ANTF) संपर्क साधावा. संपर्क करण्यासाठी कंट्रोल रूम WhatsApp : 7218000073 या क्रमांकावर किंवा spadmin.antf@mahapolice.gov.in या ई-मेलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सिप्लाच्या पुणे गोदामाचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई