कोल्हापुरात पोल्ट्री फार्ममध्ये MD निर्मितीचा पर्दाफाश; 1.13 कोटींचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मिरा रोड, ठाणे येथील रहिवासी इरफान सलीम खान याच्या चौकशीतून समोर आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एका पोल्ट्री फार्मचा वापर कथितरित्या मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाच्या बेकायदा निर्मितीसाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र अंमली पदार्थविरोधी कृती दलाने (ANTF) केलेल्या कारवाईत उघडकीस आला. या कारवाईत तयार मेफेड्रोन, कच्ची रसायने आणि अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरली जाणारी प्रयोगशाळेतील विविध उपकरणे असा एकूण 1 कोटी 13 लाख 51 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मिरा रोड, ठाणे येथील रहिवासी इरफान सलीम खान याच्या चौकशीतून समोर आली. नयानगर पोलीस ठाण्यात NDPS कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार दाखल गुन्ह्यात खानला अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान खानने साथीदारांच्या मदतीने पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या मालकीच्या हाजगोळी येथील पोल्ट्री फार्ममध्ये गुप्तपणे MD निर्मितीचा कारखाना सुरू केल्याची माहिती दिल्याचे ANTFने सांगितलं.
या माहितीच्या आधारे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन बोधे यांच्या नेतृत्वाखाली ANTFच्या पथकाने पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. या कारवाईत तेथे अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरली जाणारी यंत्रणा कार्यरत असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. पोल्ट्री फार्ममधून 208 ग्रॅम तयार मेफेड्रोन, मोठ्या प्रमाणात कच्ची रसायने तसंच विविध प्रयोगशाळा व प्रक्रिया उपकरणे जप्त करण्यात आली.
FDA ची मोठी कारवाई! मॅकडोनाल्ड्ससह 13 आस्थापनांचे परवाने निलंबित; तपासणीत गंभीर त्रुटी उघड
जप्त केलेल्या साहित्यामध्ये सुमारे 70 लिटर 40 टक्के मोनोमेथिलामाइन द्रावण, 2-ब्रोमो रसायनाची पावडर आणि इतर कच्च्या रसायनांचा समावेश आहे. त्याचबरोबर फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, हायड्रोमीटर, टेस्ट ट्यूब, प्रयोगशाळेतील काचेच्या बरण्या, इंडिकेटर पेपर, हातमोजे, स्पीड-कंट्रोलर रेग्युलेटर, ओव्हन टेस्टर, ग्रिलर आणि मिश्रणासाठी वापरले जाणारे मोटर उपकरणही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी NDPS कायदा 1985 मधील कलम 8(c), 21(c), 22(c) आणि 29, तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 238 आणि 111 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेला हा कथित अमली पदार्थ निर्मितीचा व्यवसाय स्वतंत्र स्वरूपाचा होता की त्यामागे मोठे आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीचे जाळे आहे, याचा तपास ANTFकडून सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर तपासाचा पुढील टप्पा सुरू झाला असून जप्त करण्यात आलेल्या रसायनांचा स्रोत, तयार करण्यात आलेल्या MDचा पुरवठा कुठे केला जाणार होता आणि या संपूर्ण व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. शहरांपासून दूर असलेल्या पोल्ट्री फार्मसारख्या ठिकाणांचा कथित अमली पदार्थ निर्मितीसाठी वापर होत असल्याने या प्रकारामुळे तपास यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. वरिष्ठ ANTF व CID अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली असून अमली पदार्थांविरोधातील राज्याच्या शून्य-सहिष्णुता धोरणांतर्गत तपास अधिक व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.