IFFI 2026: अभिनयाला वयाचं बंधन नाही, टॅलेंट महत्त्वाचं; मुकेश छाबरा यांचा नवोदित कलाकारांना सल्ला

IFFI 2026 Mukesh Chhabra Acting Tips: नवोदित कलाकारांना प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

IFFI 2026 Mukesh Chhabra Acting Tips: नवोदित कलाकारांना प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

IFFI 2026 Mukesh Chhabra Acting Tips: गोवा : अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) ‘द कास्टिंग मॅजिक : ऑडिशन्स अनप्लग्ड’ या विषयावर त्यांचा मास्टरक्लास पार पडला. यावेळी नवोदित कलाकार, चित्रपट निर्माते, लेखक आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

टाटा सन्समधील वाद कोर्टात; चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे आव्हान, उद्या सुनावणी!

महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांनी छाबरा यांच्या कामाचे कौतुक केले. “मुकेश यांच्याकडे पात्र ओळखण्याची उत्तम नजर आहे. भूमिकेला योग्य कलाकार शोधण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात,” असे ते म्हणाले.

300 हून अधिक चित्रपट आणि वेब सीरिजसाठी कास्टिंग केलेल्या छाबरा यांनी कलाकार निवडीमागची प्रक्रिया सांगितली. “आपल्या देशात प्रचंड टॅलेंट आहे. योग्य कलाकार शोधण्यासाठी माझी टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाते. देशातील विविध सांस्कृतिक कला आणि उपसंस्कृतींमध्ये अनेक प्रतिभावान कलाकार आहेत,” असे त्यांनी सांगितले.

चित्रपटाची स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर दिग्दर्शक सर्वप्रथम कास्टिंगसाठी त्यांच्याशी चर्चा करतात. पात्राची पार्श्वभूमी, दिग्दर्शकाची कल्पना आणि भूमिकेला आवश्यक असलेले गुण समजून घेऊन कलाकाराची निवड केली जाते. “दिग्दर्शक माझ्याकडे कलाकारांच्या डेटासाठी नाही, तर माझे मत आणि कल्पना जाणून घेण्यासाठी येतात. मी कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातील दुवा आहे,” असे छाबरा म्हणाले.

‘विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता कोयता नगरी बनत आहे’; सुषमा अंधारेंचा पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून घणाघात

कास्टिंगच्या मोठ्या प्रक्रियेची उदाहरणे देताना त्यांनी ‘दंगल’ चित्रपटाचा किस्सा सांगितला. या चित्रपटासाठी जवळपास 2 वर्षे कास्टिंग सुरू होते आणि सुमारे 14 हजार मुलींचे ऑडिशन घेण्यात आले. तर ‘रामायण’ चित्रपटाच्या कास्टिंगसाठी तब्बल 6 वर्षे लागली. ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी 384 कलाकारांची निवड केली होती. या चित्रपटाने आपल्या आयुष्याला मोठे वळण दिले, असेही त्यांनी सांगितले.

‘नकार मिळाला तरी खचून जाऊ नका’

ऑडिशनमध्ये नकार मिळणे हा अभिनय क्षेत्रातील प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे निराश न होता प्रयत्न सुरू ठेवावेत, असा सल्ला छाबरा यांनी दिला.

“नकार हा आयुष्याचा एक भाग आहे. सतत नकारामुळे दुःखी राहिलात, तर अनेक संधी गमावाल,” असे ते म्हणाले. स्वतःलाही सुरुवातीच्या काळात अनेक दिग्दर्शकांनी नकार दिला होता. मात्र, आज त्यापैकी काही दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अभिनयाला वयाचं बंधन नाही’

अभिनय करण्यासाठी वयाची मर्यादा नसून 40, 50 किंवा 60 व्या वर्षीही या क्षेत्रात येता येते. चित्रपटसृष्टीला प्रत्येक वयोगटातील कलाकारांची गरज असते, असे छाबरा यांनी स्पष्ट केले.

Video : सुनेत्रा पवारांना ताकद द्या पण, फडणवीस नको; रोहित पवारांचा थेट इशारा

“तुम्हाला अभिनय करता येतो, असा विश्वास असेल तर काम करत राहा. अभिनयाचा वयाशी काहीही संबंध नाही. टॅलेंट हेच महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

कलाकारामध्ये अभिनयासोबत प्रामाणिकपणा, साधेपणा आणि दिग्दर्शकाच्या सूचना समजून घेण्याची क्षमता असणेही गरजेचे आहे. “तुम्हाला आयुष्य आणि माणसांच्या भावना समजत असतील, तर तुम्हाला अभिनयही समजतो,” असे त्यांनी सांगितले.

ऑडिशन देताना काय काळजी घ्यावी?

ऑडिशन देण्यापूर्वी पात्र आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. संवाद पाठ करण्यापेक्षा ते पात्र मनात उभे करणे महत्त्वाचे असल्याचे छाबरा यांनी सांगितले.

सेल्फ टेप ऑडिशनसाठी पार्श्वभूमी स्वच्छ आणि साधी ठेवावी, अनावश्यक मेकअप टाळावा आणि अभिनयावर लक्ष केंद्रित करावे. कॅमेऱ्यातून कलाकाराचे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दिसतील, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

IFFIमध्ये चित्रपटांसोबत खाद्यसंस्कृती, कला आणि मनोरंजनाचीही मेजवानी; सर्जनशील उपक्रमांनी महोत्सव परिसर गजबजला

सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा अभिनयातील कौशल्य वाढवण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास आणि अभिनय सुधारण्यासाठी थिएटरमध्ये काम करणे फायदेशीर ठरते, असेही त्यांनी सांगितले.

“संपूर्ण प्रवास हा संयम आणि सकारात्मकतेचा खेळ आहे. एखादी गोष्ट तुमच्यासाठी असेल, तर ती तुमच्यापर्यंत नक्की येईल. नैसर्गिक आणि साधे राहा,” असा संदेश मुकेश छाबरा यांनी नवोदित कलाकारांना दिला.

follow us