पुणे : माजी नगरसेवक आणि पुण्याच्या राजकारणातील, रील आणि रिअल लाईफमधील दबंग व्यक्तिमत्व समजल्या जाणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) उर्फ तात्या यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शेकडो गाड्या आणि पदाधिकाऱ्यांच्या ताफ्यासह त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन हाती शिवबंधन बांधले. मोरे यांच्या एन्ट्रीने पुण्यात काहीशी झाकोळलेली ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आता तरी चर्चेत येईल अशी शक्यता दिसू लागली आहे. (Former corporator Vasant More alias Tatya joined the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party.)
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोरे यांनी मनसेचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली. पण त्यांना अवघी 42 हजार मते मिळाली. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तात्यांच्या एन्ट्रीने ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात एक आक्रमक चेहरा मिळाला आहे. त्यांची आंदोलनाची स्टाईल असो की काम करण्याची पद्धत असो. ती नेहमीच चर्चेत राहणारी असते.
वसंत मोरे यांच्या या एन्ट्रीने एका बाजूला ठाकरेंना हा फायदा होणार असला तरीही महाविकास आघाडीत हडपसर मतदारसंघातील इच्छुकांच्या गर्दीत मात्र भर पडली आहे. महायुतीने नुकतेच इथले माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधान परिषदेचे तिकिट दिले. त्यांचे पुनर्वसन केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चेतन तुपेंचा मार्ग मोकळा झाला. असे असतानाच ठाकरेंनी मात्र मोरेंना प्रवेश देऊन आणखी एक इच्छुक आघाडीच्या वळचणीला आणल्याचे बोलले जात आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. इथे शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक योगेश ससाणे हे इच्छुक आहेत. तर ठाकरेंकडून माजी आमदार महादेव बाबर तयारी करत आहेत. त्यांनी लोकसभेला अमोल कोल्हे यांच्या प्रचारात स्वतःला अक्षरशः झोकून दिले होते. आता मोरे हेही हडपसरमधूनच इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
मोरे यांनी यापूर्वीही हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2019 मध्ये ते मनसेच्या चिन्हावर मैदानात उतरले होते. त्यामुळे निवडणूक तिरंगी झाली होती. या लढतीत चेतन तुपे यांचा अवघ्या 2 हजार 820 मतांनी विजय झाला होता. त्यावेळी मोरे यांना तिसऱ्या क्रमांकाची 34 हजार 809 मते मिळाली होती. त्यानंतर ते पुन्हा एकदा हडपसरमधूनच मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांच्या गर्दीत भर पडली आहे. यात आता कोण बाजी मारणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.