हडपसर : महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होऊन बरीच वर्षे झाली आहेत. मात्र, तरीही अनेकजण अशा भूलथापांना बळी पडून आपलं सर्वस्व गमावतात. यामध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्हींचा समावेश आहे. याचाच प्रत्यय देणारी एक घटना विद्येच माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) घडली. 18 लाखांचे आणि 5 कोटी रुपये करून पैशांचा पाऊस पाडतो, असं सांगून फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबासह चौघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना महिनाभरापूर्वी ससाणेनगर काळेपडळ रस्त्यावर एक महिन्यापूर्वी घडली होती. विनोद छोटेलाल परदेशी (वय 40, रा. हडपसर) यांनी त्याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी भोंदू बाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य (सर्व बदलापूर, ठाणे), किशोर पांडागळे (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे) या चार संशयित भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वारकऱ्यांवर काळाचा घाला! पायी दिंडीत कंटेनर घुसल्यानं 4 वारकरी ठार, 8 गंभीर जखमी
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमताने फिर्यादीला १८ लाख रुपये आणण्यास सांगितले. बाबा त्याला त्या 18 लाखांचे 5 कोटी रुपये देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जेव्हा पैशाचा पाऊस पडेल तेव्हा हे सर्व पैसे वसूल होऊन आपण गर्भश्रीमंत होऊ, या लालसेपाटी फिर्यादीने बँकेतून 18 लाख रुपये काढून महाराजांसमोर ठेवले. महाराज हातात लिंबू घेऊन विधी करत होते. दरम्यान, अचानक त्या ठिकाणी पोलीसांसह चार-पाच इसम आले. ते 18 लाख रुपये घेऊन निघून गेले. काही वेळातच आलेले पोलिस बनावट असल्याचं समजलं. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरड केली. मात्र, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्याात आली. भीतीपोटी फिर्यादीने आता बाबा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात 18 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पैशांचा पाऊस पाडतो, असं सांगणाऱ्या भोंदूसह त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.