लाचखोर आयुक्त शैलजा दराडेला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, 44 जणांची कोट्यावधींची फसवणूक
पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना हडपसर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. दराडे यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (State Examination Council Commissioner Shailaja Darade remanded in police custody till August 12)
शैलजा दराडे यांनी 2019 मध्ये नोकरीच्या लावण्याच्या आमिषाने 44 जणांकडून पैसे घेतले. तलाठी आणि आरटीओ परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या वेगवेगळ्या परिक्षार्थीकडून सुमारे 4 कोटी 85 लाख रुपये स्वीकारले. अखे काल त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून यासंदर्भात काही ऑडिओ जप्त करण्यात आले आहेत. यानंतर आज दराडे यांना शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दराडे यांच्याकडून जप्त केलेल्या ऑडिओतील आवाजाची सत्यता तपासण्यासाठी 7 जणांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
शैलजा दराडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पैशांचा अपहार केला. हुशार विद्यार्थ्यांना डावलून त्यांनी अपात्र विद्यार्थ्यांना नोकरी लावली असण्याची शक्यता आहे. दराडे यांनी अशाच प्रकारे आणखी काही लोकांना पैशाचे आमिष दाखवून नोकरीवर लावले का? हा प्रश्न आहे. खोटे आश्वासन देऊन 4 कोटी 85 लाख रुपये त्यांनी स्वीकारले. त्यांनी पैसे कोठे ठेवले, या पैशाने काही मालमत्ता खरेदी केली का? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानंतर आज न्यायालयाने दराडे यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शैलजा दराडे यांच्यासह त्यांचे भाऊ दादासाहेब दराडे याच्याविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोपट सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी हे शिक्षक असून त्यांच्या नात्यातील दोन महिलांना शिक्षक पदावर नोकरीसाठी ते प्रयत्न करत होते. जून 2019 मध्ये सूर्यवंशी यांची दादासाहेब दराडे याच्याशी भेट झाली. त्याने आपली बहिण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकार असल्याचं सांगत सुर्यवंशी यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 27 लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नोकरी न मिळाल्यानं सूर्यवंशी यांनी पैसे परत मागितले. मात्र पैसे परत न मिळाल्यानं त्यांनी दराडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.