Guillain Barre Syndrome : ज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे. पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्ह्यांतही रुग्ण आढळले आहेत. या आजाराने काही जणांचा मृत्यूही झाला आहे. आजार संसर्गजन्य नसला तरी रग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
शहरातील ससून रुग्णालयात एका 37 वर्षांच्या रुग्णाचा या आजाराने मृत्यू झाला. या रुग्णाच्या हातांत अशक्तपणा जाणवत होता. त्याला आयव्हीआयजी इंजेक्शन दिले होते. या रुग्णाच्या तपासणीत त्याला जीबीएसचे निदान झाले होते. यानंतर त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. माक्ष 17 फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला.
धाकधूक वाढली, GBS चा आजारही वाढला; सरकार यात्रांवर निर्बंध आणणार?
शहरातील खासगी रुग्णालयातही एका मृत्यूची नोंद झाली आहे. नांदेड सिटीमधील रुग्णाला मागील महिन्यात जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. पुढे गिळण्यास त्रास होत असल्याने अन्न घेता येत नव्हते. त्यामुळे या महिलेला अशक्तपणा जाणवू लागला. यानंतर या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. प्रकृती आणखी खालावल्यानंतर व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. याचा काहीच उपयोग झाला नाही. 18 फेब्रुवारीला या महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, या आजाराने आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. या आजाराने पहिला मृत्यू सोलापुरात झाला होता. हा रुग्ण पुण्यातून सोलापुरला गेला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी मुंबईत या आजाराने पहिला मृत्यू झाला होता. वडाळ्यात राहणाऱ्या एका 53 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसने मृत्यू झाला. यानंतर आणखी काही मृत्यू झाले. राज्यातील अहिल्यानगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यांत जीबीएस आजाराचे रुग्ण सापडले आहेत.
मोठी बातमी : मुंबईत जीबीएस व्हायरसचा शिरकाव; अंधेरीला आढळला पहिला रुग्ण
दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच अर्थात जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.