Loni Kalbhor : जेवणाच्या बिलावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती येथे घडली. जगदंबा हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा आणि कर्मचाऱ्यांसह मध्यस्थी करणाऱ्या ग्राहकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात लोणी काळभोरचे माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्यासह चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री नऊच्या सुमारास एन्जेल हायस्कूलजवळील जगदंबा हॉटेलमध्ये घडली. राजेंद्र चौधरी (वय ५६) हे गेल्या ३० वर्षांपासून या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आला होता. जेवणानंतर त्याने ऑनलाइन पद्धतीने बिल भरले. त्यानंतर बिल जमा झाले आहे का, अशी विचारणा केली. हॉटेल मालकाने पैसे जमा झाल्याचे सांगितल्यानंतर रामचंद्र याने त्यांच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हॉटेलमधील गोंधळ ऐकून राजेंद्र चौधरी यांचा मुलगा मयूर चौधरी (वय २२) घटनास्थळी आला. त्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रामचंद्र याने मयूरलाही शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण केली. त्यानंतर मयूरने त्याला हॉटेलच्या बाहेर काढले.
दरम्यान, काही वेळातच रामचंद्र याचा भाऊ आणि माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्यासह स्वप्निल काळभोर व विकास काळभोर हे हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेल मालक राजेंद्र चौधरी आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यादरम्यान स्वप्निल काळभोर याने काउंटरवरील बडीशेप ठेवण्याचे काचेचे भांडे उचलून चौधरी यांच्या चेहऱ्यावर मारल्याने ते जखमी झाले. हॉटेलमधील ग्राहक दीपक कुकरेजा आणि कर्मचारी मिराज ऊर्फ शमामुल अन्सारी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली.
कर्नाटकातून आलेल्या गुटख्यावर LCB चा मोठा छापा ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त-
या घटनेची माहिती देण्यासाठी मयूर चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रार देऊन हॉटेलकडे परतत असताना डॉमिनोज पिझ्झा समोरील रस्त्यावर चौघांनी त्यांना पुन्हा अडवले. तेथेही शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी राजेंद्र चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
