Pune News : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसतर्फे आठव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३० व ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श खासदार व आमदार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष व संसदेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.
गुरुवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन सत्रामध्ये या दोन पुरस्कारांसह समाधान आवताडे यांना आदर्श आमदार, नाना काटे यांना आदर्श नगरसेवक, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच आणि अॅड. मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमित गोरखे, आमदार सत्यजित देशमुख, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी उपस्थित राहणार आहेत. ग्रामसभा ते लोकसभा याविषयावर मान्यवर आपले विचार मांडतील. यावेळी संस्थेच्या आठव्या उडानचे प्रकाशन होणार आहे.
दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजता ‘राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग’ या विषयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री यशोमती ठाकूर, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई, अहिल्या फाऊंडेशन अध्यक्ष रमाबाई लटपटे या मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शुक्रवारी (३१ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता तिसऱ्या सत्रात वर्षा मोळवणे यांना आदर्श नगरसेवक आणि ओंकार गुंडगे यांना आदर्श युवा पुरस्काराने गौरविण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार, मंदार फणसे उपस्थित राहणार आहेत. ‘माध्यमे राजकारण घडवतात?’ या विषयावर मान्यवर संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता राजेंद्र शिळीमकर यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यावेळी माजी आमदार कपिल पाटील, पत्रकार प्रसन्न जोशी, निलेश खरे उपस्थित राहणार आहेत. व्हिजन भारत २०२९ यावर आपले विचार व्यक्त करतील.
संसदेच्या समारोपप्रसंगी दुपारी ३ वाजता विजय शिवतारे, महेश लांडगे, कैलास पाटील यांना आदर्श आमदार, सत्यजित तांबे यांना युवा आदर्श आमदार, सुशील मेंगडे यांना आदर्श नगरसेवक, गजानन काळे व अजिंक्य सगरे यांना आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आमदार हेमंत पाटील, राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार संग्राम थोपटे, आमदार उत्तम जानकर आदी मान्यवर सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत यावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर लिखित मानवी कल्याणाचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
माजी मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, भारतीय छात्र संसदेचे अध्यक्ष राहुल कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर हे संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. या संसदेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ९०६७९०९०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संसद कट्टा अंतर्गत शुक्रवारी (दि.३१) सकाळी ११ वाजता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आणि तृतीय संसद कट्टा अंतर्गत दुपारी १ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाखती होणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.