Jadhavar Group of Institutes Priyadarshini Vidya Mandir won the inter-school sports trophy : पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट (Jadhavar Group of Institutes) तर्फे दुसऱ्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि ७ व्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यामध्ये दुसऱ्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत यंदा सलग दुसऱ्यांदा प्रियदर्शनी विद्या मंदिरने बाजी मारली. तर ७ व्या जाधवर क्रीडा महोत्सवात पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल यांनी सर्वाधिक विजय मिळवित फिरता करंडक पटकाविला आहे.
नऱ्हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांना आणि आदर्श खेळाडू पुरस्कार आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू साक्षी पाटील हिला प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप होते.
काका पवार म्हणाले, जगामध्ये युवा पिढी सर्वाधिक संख्येने भारतात आहे. युवा पिढीने शिकणे गरजेचे आहे. मला कोणते क्षेत्र निवडायचे हे ठरविणे महत्वाचे आहे. शिक्षण, खेळ, व्यापार काहीही असो त्याची निवड योग्यरितीने करणे गरजेचे आहे. बुद्धी आणि शक्तीची सांगाड घालणे आवश्यक आहे. त्यासोबतच मनाची सांगड देखील गरजेची आहे. क्रीडा क्षेत्रातून नोकरीच्या संधी मिळू शकतात. ध्येय गाठण्यासाठी कष्ट करावे लागतील.
साक्षी पाटील म्हणाली, स्वसंरक्षणाचे धडे घेण्यासाठी मी तायक्वांदोचा क्लास लावला. हळूहळू फिजिकल अॅक्टिव्हिटी म्हणून सुरुवात केली आणि मग स्पर्धा देखील खेळू लागले. खेळात लगेच यश मिळावे, असे होत नाही. त्याकरिता खेळात सातत्य राहायला हवे. माझे प्रशिक्षक व पालकांमुळे मी हा यशस्वी प्रवास करू शकलो. अभ्यासासोबत खेळ देखील गरजेचा आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, बल, बुद्धी, सदविचारासाठी शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले जाते. यावर्षी तब्बल 25 हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. तळागाळातील गुणवंत विद्यार्थी खेळांमधून पुढे येत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात खेळाला महत्व दिले जात आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.