Download App

Kasba Bypoll रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

पुणे : कसबा पेठ मतदार संघात (Kasba Bypoll) एकूण २१ नगरसेवक असून त्यापैकी भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच या मतदार संघाकडेच सलग चार वर्षे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. या पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना निवडून आणण्यासाठी या १६ माजी नगरसेवकांना (पैकी २ नगरसेवकांचे निधन झाले) काम करण्याचे आदेश दिले होते. तसेच जर हेमंत रासने निवडून आले नाही तर येणाऱ्या महापालिकेत तुम्हाला नगरसेवकाचे तिकीट मिळणार नाही, असा एकप्रकारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दमच दिला होता. दरम्यान, या पोटनिवडणुकीत हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव झाल्याने आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय होणार या भीतीने भाजपचे (BJP) ते १६ नगरसेवक चिंताग्रस्त झाले आहेत.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली तर हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मते मिळाली. सुरुवातीपासून अगदी अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे तब्ब्ल १० हजार ८२८ मतांनी विजयी झाले. विशेष बाब म्हणजे हेमंत रासने यांचा स्वत: मतदार संघ आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या भागातून भाजपला पर्यायाने मतांचे लीड मिळालेच नाही. त्यामुळे देखील भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

Ashok Chavan : कसब्यात मतदारांनी पैशांची दडपशाही झुगारली…

गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेत कसबा मतदार संघाला देवेंद्र फडणवीस यांनी झुकते माफ दिले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कारण भाजपचा हा बालेकिल्ला असलेला कसब्यात १६ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या भागाला भरभरून निधी दिला. तसेच सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपदही दिले. त्यामुळे ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. संपूर्ण मतदार संघात जवळपास १०० नगरसेवक तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ या निवडणुकीत उतरले होते. शेवटचे तीन-चार दिवस तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कसब्यात तळ ठोकून होते. तरीही हेमंत रासने यांचा पराभव हा भाजपला जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे भाजपच्या पुणे महापालिकेतील त्या १६ माजी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला आहे.

Tags

follow us