Download App

Kasba Bypoll : नाराज बाळासाहेब दाभेकरांना थेट राहुल गांधींचा फोन, म्हणाले….

  • Written By: Last Updated:

Pune Bypoll election : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण धंगेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्येच बंडखोरी उफाळून आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीचसमोर दाभेकरांची बंडखोरी आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती.

याचमुळे काँगेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दाभेकरांची मनधरणी सुरु होती. पण त्यानंतर थेट दिल्लीतून राहुल गांधी यांचा फोन आल्यामुळे त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे.

हेही वाचा :  Kasba Peth Bypoll : टिळकांना उमेदवारी का दिली नाही म्हणून पोटनिवडणुकीत उडी घेणारे… आनंद दवेंची संपत्ती किती?

बाळासाहेब दाभेकर म्हणाले की, माझी अनेकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी निवडणूक लढवण्यावर ठाम होतो. मात्र राहुल गांधींच्या फोननंतर मी तयार झालो. राहुल गांधी यांनी माझी नाराजी दूर केली आहे. आता मी पक्षावर नाराज नाही. उमेदवारी अर्ज मी मागे घेणार आहे.

यंदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या रुपात तगडा उमेदवार दिल्याने भाजपच्या हेमंत रासने यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक नव्हे तर दोन विधानसभा निवडणुकांमध्ये गिरीश बापट यांना पाळता भुई थोडी केली होती. त्यामुळे हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांचे तगडे आव्हान असणार आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात १९९५ पासून भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २०१९ साली गिरीश बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या कसब्याच्या आमदार झाल्या. या पोटनिवडणुकीच्या रूपाने काँग्रेसला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी चालून आहे.

Tags

follow us