Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. त्यात उमेदवारीवरून देखील नेत्यांची रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमीच शाब्दिक चकमक पाहायला मिळणारे पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले हेमंत रासने यांच्यात ‘बॅनरवॉर’ पाहायला मिळत आहे.
Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
त्यात धंगेकरांच्या पुणे लोकसभा उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्यापासून त्यात अजूनच भर पडली आहे. पुण्यात धंगेकरांचे भावी खासदार म्हणून कसब्यात बॅनर लागले आहेत. मात्र, त्यांच्या बॅनरसमोरच हेमंत रासने यांचे बॅनर लागले असल्याने लक्ष वेधन आहेत. समोरासमोर लागलेल्या या बॅनरमुळे पुण्यात रासने आणि धंगेकर यांच्यामध्ये एकप्रकारे बॅनरवॉरच पाहायला मिळत आहे. धंगेकरांच्या बॅनरवर “जो 24 तास पुण्यासाठी तोच 2024 ला पुण्यासाठी”, तसेच भावी खासदार म्हणून उल्लेख केला आहे. तर याच त्यांच्या बॅनरच्या समोर रासने यांचा बॅनर लागला असून त्यांच्या बॅनरवर “होय हे आम्ही केलं” असा उल्लेख करत धंगेकरांना डिवचलं आहे.
मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार
रासनेंच्या बॅनरवर होय आम्ही केलं, असा उल्लेख करत धंगेकरांच्या एक वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात तुम्ही काय केलं, असा अप्रत्यक्ष सवालच विचारला आहे. धंगेकरांच्या आमदारकीच्या वर्षपूर्तीवर त्यांच्या कामाची खिल्ली उडवली होती आणि आश्वासन देणाऱ्या आमदाराने काय कामे केली?,असा सवाल विचारला होता. आता त्यानंतर बॅनरच्या माध्यमातून आम्ही काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न रासनेंकडून केला जात आहे. धंगेकरांकडून लोकसभेसाठी भाजपच्या बड्या नेत्यांना चॅलेंज केलं जात आहे.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीमध्ये रासने यांचा धंगेकरांकडून पराभव झाल्यानंतर या दोघांमध्ये नेहमीच कलगीतुरा रंगताना दिसतो. आता धंगेकर लोकसभेच्या तयारीला लागले असताना रासनेंकडून आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कामाची विचारणा केली जात आहे. महाविकास आघाडीकडून धंगेकरांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली तर या दोघांमधील शाब्दिक चकमक यापुढेही पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही.