विष्णू सानप :
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या हालचालीला वेग आला असून मतदारसंघातील आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. मुंबईत काल आणि आज (३० मे) राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडत आहे. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येत आहे. काल सातारा, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर परभणी, बीड, नाशिक, दिंडोरी आणि धाराशिव या मतदारसंघाची बैठक पार पडल्यानंतर कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, भंडारा-गोंदिया, जळगाव, रावेर, बुलढाणा, रायगड, मावळ, बारामती या मतदारसंघांबाबत चर्चा होणार आहे. (Lok Sabha election 2024 Maval Lok Sabha constituency, NCP Candidate Parth Pawar)
यामध्ये मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदार तथा माजी मंत्री आदिती तटकरे यांचे नाव पुढे आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यातही आदिती तटकरे यांच्या नावावर प्राधान्याने विचार होणार असल्याचं सांगिलतं जात आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरविले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून पार्थ पवार यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. राजकारणामध्ये पवार कुटुंबातील सदस्याचा हा पहिलाच पराभव होता. त्यामुळे या पराभवाचे शल्य पवारांना आणि राष्ट्रवादीला आजही आहे. यामुळेच आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली जात आहे.
मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर बारणे यांनी सलग 2 वेळेस बाजी मारली आहे. मात्र, आता बरीच राजकीय गणित बदलली आहेत. बारणे आता शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीसोबत यावेळेस खुद्द उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यामुळे या मतदारसंघांमध्ये उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातूनच बारणे यांच्यासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक एक मोठं आव्हान असल्याचं बोललं जातं आहे.
राष्ट्रवादीला इथून ठाकरे गटाची साथ मिळणार हे गृहीत धरले तरी पार्थ पवार यांच्याऐवजी आदिती तटकरे यांच्यासाठी प्राधान्याने विचार होण्याचे कारण म्हणजे, पार्थ पवार यांची स्वतःची अशी ताकद या मतदारसंघामधून नाही. 2019 च्या निवडणुकीनंतर ते फारसे या मतदारसंघांमध्ये सक्रिय दिसले नाहीत. त्यामुळे त्यांना परत या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील याची शक्यता फार कमी आहे.
त्याचवेळी मावळ मतदारसंघातील कर्जत, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघात तटकरे कुटुंबीय चांगली ताकद बाळगून आहे. शेजारच्याच रायगडमधून वडील सुनील तटकरे खासदार आहेत. आदिती यांनीही मंत्री आणि आमदार म्हणून काम करताना रायगड जिल्ह्यात आपली फळी उभी केली आहे. याशिवाय राष्ट्रवादीचीही मोठी ताकद आहे.
दुसऱ्या बाजूला बारणे यांचा मावळ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ सोडले तर इतर मतदारसंघांमध्ये म्हणावा तसा प्रभाव नाही. त्यांची पूर्ण भिस्त भाजपच्या मतांवर असल्याचं बोललं जात आहे. यामुळे थोडीफार स्वतःची ताकद असलेला उमेदवार राष्ट्रवादीने दिला तर या ठिकाणी विजयश्री खेचण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाही, त्यामुळेच आदिती तटकरे यांचे नाव पुढे आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, तर मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्याही नावाची अधून-मधून चर्चा होत असते. मात्र, त्यांना विधानसभेतच जास्त रस असल्याने ते लोकसभेसाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आदिती तटकरे यांच्या नावावर एकमत होईल आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल, असं बोललं जात आहे. आता या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काय रणनीती आखण्यात येते आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे लोकसभेपूर्वी स्पष्ट होईल. पण तूर्तास तरी या मतदारसंघातून आदिती तटकरे यांच्या नावाची मात्र जोरदार चर्चा होत आहे.