Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदारसंघातून भाजपच्या इच्छुकांची मोठी संख्या पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील कसबा, पर्वती, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि कोथरूड या सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांनी भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. नेमकी इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्वच मतदारसंघातील इच्छुकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वात सेफ मतदारसंघ असलेल्या कोथरूड मतदारसंघातील इच्छुक अमोल बालवडकर यांची समजूत काढण्यात अद्यापही त्यांना यश आल्याचं दिसत नाही.
पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पुण्यातील सहा मतदारसंघातील इच्छुकांच्या भेटीगाठी घेत होते. मात्र त्यांच्याकडे अमोल बालवडकर फिरकले नाहीत. यामुळे बावनकुळेंना बालवडकर यांच्या घरी यावं लागलं. त्यांच्यामध्ये तब्बल दोन तास चर्चाही झाली मात्र या चर्चेतून फारसं काही हाती लागल्याचं दिसत नाही.
बावनकुळे आणि बालवडकर दोघांत उमेदवारीवर चर्चा झाली. बावनकुळे यांनी बालवडकर यांना तुम्ही भाजपसाठी महत्त्वाचे आहात आगामी महापालिका निवडणुका आल्या आहेत. उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही त्यावर आपण विचार करू मात्र तुम्ही पक्षाचे काम करा, असं आवाहन बावनकुळेंनी केल्याची माहिती आहे.
Chandrasekhar Bawankule: जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष; मुख्यमंत्रिपदावरून बावनकुळेंच मोठ विधान
या भेटीबाबत बालवडकर यांना विचारले असता बालवडकर म्हणाले, ‘बावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते हे खरं आहे. त्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, मी त्यांना उमेदवारी मागितली त्यांनी याबाबत विचार करू, असं मला आश्वासन दिलं. मी अजूनही आशावादी आहे. मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे’, अशी प्रतिक्रिया बालवडकर यांनी लेट्सअप मराठीला दिली.
दरम्यान, पुणे शहरातील भाजपचा सर्वात मजबूत असा मतदारसंघ म्हटल्यास कोथरूडचा उल्लेख केला जातो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील करतात. मात्र भाजपचे नगरसेवक आणि याच परिसरातील अमोल बालवडकर यांनी शड्डू ठोकल्याने चंद्रकांत पाटलांना आणि भाजपला विचार करण्यास भाग पाडलं आहे. शहरातील इतर मतदारसंघातील इच्छुकांप्रमाणे बालवडकर प्रदेशाध्यक्षांना भेटायला गेले नाहीत यावरूनच बालवडकर कुठल्या मूडमध्ये आहेत हे सांगण्याची गरज नाही.
नेमकं हेच हेरून बालवडकर यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही म्हणून खुद्द बावनकुळे बालवडकर यांच्या घरी गेले होते. मात्र या चर्चेतून फारसं काही हाती लागलं असं दिसत नाही. उमेदवारी जाहीर झाल्यावर बालवडकर यांच्या पदरात काय पडतं आणि चंद्रकांत पाटलांचच नाव उमेदवार म्हणून घोषित झाल्यास बालवडकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुणेकरांसाठी गुड न्यूज : खडकवासला ते हडपसर अन् नळस्टॉप ते माणिकबाग मेट्रोने जाता येणार