– विष्णू सानप
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन युत्या अन् आघाड्या पाहायला मिळाल्या आता पुन्हा एकदा सत्तेसाठी नव्हे तर, विरोधकाची ठाम भूमिका बजावण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadeo Jankar) प्रहारचे बच्चू कडू (Bachu Kadu) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी एकत्र येणार आहेत.
महादेव जानकर यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद’ 20 एप्रिल रोजी फुले वाड्याजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे दोघेही उपस्थित असणार असल्याने एका नव्या आघाडीचा उदय होणार असं बोललं जात आहे.
महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेला भाजपसोबत महायुतीमध्ये होता मात्र विधानसभेला आपला सन्मान केला जात नाही यावरून जानकरांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ते स्वतंत्र लढले आणि गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे हे एकमेव त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडून आले. मात्र इतर ठिकाणी जाणकारांना यश मिळालं नाही. निवडणूका लढणं सोप आहे मात्र, उमेदवार निवडून आणण्यासाठी युती आघाडी करणे गरजेचे असल्याचे राज्यातील मोठ्या पक्षांनाही ठाऊक आहे. तर जानकर, राजू शेट्टी आणि बच्चू कडू आणि इतर स्वतंत्र संघटना पक्षांना एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही हे चांगल्या प्रकारे माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याने प्रमुख विरोधी पक्ष असलेले महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच पुरत अवसान गेलेल आहे. फडणवीस सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून हे कमी पडत असल्याची भावना जनमानसामध्ये आहे. नेमकी हीच विरोधकांची स्पेस भरून काढण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न कांशीरामांचे शिष्य महादेव जानकर करतील असं राजकीय जाणकारांचा मत आहे.
जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आक्रमक नेत्यांची आवश्यकता असते यामध्ये करारी बाणा अन् आक्रमक चेहरे असलेले प्रहार’चे बच्चू कडू तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रान पेटवणारे राजू शेट्टी तर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क असलेले जानकर एक वेगळा राजकीय प्रयोग करून पाहत आहेत. जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त जरी असलं तरी युवा संघर्ष निर्धार परिषदेच्या माध्यमातून या आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत जानकर यांच्या म्हणण्यानुसार याबाबतची स्पष्टता त्याच कार्यक्रमात येईल, असा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.
ठाकरेंची वाघीण देणार पिता-पुत्रांना मोठा धक्का; ‘राजकीय घटस्फोट’ घेत करणार दादांच्या पक्षात प्रवेश?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जाणकारांच्या पदरी काहीसं यश मिळालं असलं तरी संभाजी राजे छत्रपती यांच्या ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडी सोबत राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांना विधानसभेत भोपळाही फोडता आला नाही. बच्चू कडू आणि शेट्टी हे दोघेही आपली स्वतंत्र ताकद बाळगून आहेत, मात्र एकट्याने लढून फारसं यश मिळणार नाही हे ओळखूनच त्यांनी संभाजीराजेंसोबत एक प्रयोग केला होता मात्र त्यास यश मिळालं नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ताकद असलेल्या तीनही नेत्यांनी आघाडी करण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू यांचा आक्रमक चेहरा, विदर्भातील ताकद, राजू शेट्टी यांच शेतकऱ्यांशी असलेलं नेटवर्क त्याला महादेव जानकर यांच्या रूपाने ओबीसी चेहरा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या संख्येने असलेला धनगर मतदार जाणकारांच्या जमेच्या बाजू आहेत. एकंदरीत तिघांचीही ताकद पाहता निवडणुकीसाठी पुरक आहे. पात्र प्रत्यक्षात या गाडीला किती यश मिळतं हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल. तूर्तास जानकर यांच्या वाढदिवशी या परिषदेत हे तिन्ही नेते काय गौप्यस्फोट करणार आणि काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
याचं कारण असं की हे तीनही नेते आपल्या आधीच्या राजकीय मित्रांपासून दुखावलेले आहेत. बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून तर महादेव जानकर भाजपवर नाराज आहेत तर, राजू शेट्टींचं दुखनच वेगळ आहे. त्यामुळे या परिषदेत तीनही नेत्यांच्या भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.