Ajit Pawar on Sharad Pawar : शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी जुन्नर तालुक्यातील केंदूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा मनातील खंत बोलून दाखवली. मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण मी फक्त त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कुठला न्याय? असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी मनातील खंत बोलून दाखवली.
आम्ही दिवसरात्र काम केलं सगळा जिल्हा सांंभाळला. साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यापासून अगदी आजपर्यंत बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली आहे. मी कुणाला कधी वाऱ्यावर सोडत नाही. पिंपरी चिंचवड शहराचा विकास करून दाखवला. कारण मी कामाचा माणूस आहे. मी एखादी गोष्ट मनावर घेतली की करतोच. बारामती कशा पद्धतीनं बदलली एकदा येऊन पाहा.
निवडणुका लागताच राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत; शरद पवारांच्या विधानावर अजितदादा स्पष्ट बोलले
काल शिरुरमध्ये एक सभा झाली तिथं कुणीतरी बरळलं की अजितदादाने घोडगंगा कारखाना बंद पाडला. अरे बाबा ना मी त्या कारखान्याचा चेअरमन ना सभासद. माझा काय संबंध. तरी देखील कारखाने बंद पाडल्याचं खापर माझ्यावर फोडलं जातं. आमच्या मतदारसंघातील कारखाने आम्ही चांगल्या पद्धतीने चालवत आहोत. शेतकऱ्यांच्या उसाला देखील चांगला भाव देत आहोत. तुम्हाला संचालक म्हणून कारखान्याचं काम पाहता आलं नाही. त्यामुळे कारखाने बंद पडत आहेत त्याचं खापर माझ्यावर कशाला फोडता, असा सवाल अजित पवार यांनी केला.
मी तुम्हाला आढळराव पाटलांना निवडून देण्याचं का सांगत आहे तर आपल्याला येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणायचा आहे. त्यामुळे या मतदारसंघात आपला खासदार निवडून आणणे गरजेचं आहे. गिरीश बापट यांनी पुण्यासाठी चांगला निधी आणला होता तसाच निधी आपल्याला येथे आणायचा आहे. आताचे इथले खासदार मला नेहमी राजीनामा देणार असल्याचे म्हणायचे. मुंबईला शुटिंग असते त्यामुळे मतदारसंघाला वेळ देणं शक्य होत नाही असं तेच सांगायचे. पण तरीही पाच वर्ष मी त्यांना कसंबसं थांबवलं, असा किस्सा अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबतीत सांगितला.
बारामतीत मतदानाचा कमी टक्का, कुणाला देणार धक्का? पुतण्या अन् काकांचंं वाढलं टेन्शन