Making obscene gestures at the media : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या खळबळजनक हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. तपासाची व्याप्ती वाढत असतानाच आता पंचनाम्यासाठी पुण्यात आणलेल्या सिया गोयलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माध्यमांचे कॅमेरे पाहत सियाने कथितरित्या अश्लील हावभाव केल्याचा दावा केला जात असून, त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर आणि विविध स्तरांतून तीव्र टीका होत आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने सिया गोयलला गुरुवारी (2 जुलै) पुण्यातील विविध ठिकाणी नेले. मार्केट यार्ड परिसरातील ‘लीलाकुंज’ या तिच्या निवासस्थानी पोलिसांनी तपास केला. त्यानंतर लुल्लानगर परिसरातील फाखरी हिल्समधील ‘एरिया 37’ येथेही तिला घेऊन जाऊन पंचनामा करण्यात आला. या सर्व ठिकाणी घटनापूर्वी आणि घटनेनंतर सियाची हालचाल काय होती, कोणाला भेटली, तसेच तपासासाठी आवश्यक असलेले पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडेही जप्त केले आहेत. हे कपडे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्यातून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी कथितपणे ज्या ठिकाणी सराव केला होता, त्या ठिकाणालाही पोलिसांनी भेट देत पंचनामा केला आहे. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांचीही पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
सुनावणीत हायकोर्टाचा राजकीय टोला; तुमच्यावर गुन्हे आहेत? पक्ष बदला, तिथं वॉशिंग मशीन आहे
दरम्यान, सियाला तिच्या घरातून बाहेर आणत असताना उपस्थित माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहून तिने कथित अश्लील हावभाव केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीचे हे वर्तन धक्कादायक असल्याची टीका अनेकांनी केली आहे. मात्र, या व्हिडीओबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
केतन अग्रवाल यांची 18 जून रोजी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, मोबाईल डेटा, डिजिटल पुरावे, घटनास्थळावरील वैज्ञानिक तपास आणि आरोपींची चौकशी अशा विविध माध्यमांतून पुरावे गोळा केले जात आहेत. दरम्यान, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज (3 जुलै) संपत असल्याने दुपारी 2.30 वाजता त्यांना वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सियाच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग, तर चेतनच्या वतीने ॲडव्होकेट राम शहाणे न्यायालयात बाजू मांडणार आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस तपास अद्याप अपूर्ण असल्याचे सांगत दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आरोपींच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय, तपासातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आरोपींच्या पॉलिग्राफ (लाई डिटेक्टर) चाचणीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली जाऊ शकते. त्यामुळे आजची न्यायालयीन सुनावणी या बहुचर्चित हत्याकांडाच्या तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
