Mandar Kiwale Attack : कोर्टाची तारीख ठरली टार्गेट, सुपारी मिळाली अन्…

Pune Mandar Kiwale Attack मंदारला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलीस आयुक्तांनी दिली A टू Z माहिती

Pune CP Amitesh Kumar On Mandar Kiwale Attack

Pune CP Amitesh Kumar On Mandar Kiwale Attack

Pune CP Amitesh Kumar On Mandar Kiwale Attack : शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत अवघ्या काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या थरारक घटनेमागील संपूर्ण कट, सुपारी आणि तपासाची सविस्तर माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

दोन दिवसांत रचला हत्येचा कट कात्रजमधील शुभम चव्हाण खून प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळे (वय ३५) याच्यावर बुधवारी (दि. २५) दुपारी एकच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाबाहेर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला होता. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, मंदार तीन दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. तो नेमका कुठे आहे याची कल्पना आरोपींना नव्हती; मात्र बुधवारी त्याची कोर्टाची तारीख असल्याने तो शिवाजीनगर कोर्टात येणार असल्याची खात्रीशीर माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार अवघ्या दोन दिवसांपूर्वी हा कट रचण्यात आल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. ज्यांनी या हल्ल्याची सुपारी दिली, त्यांनी काही रक्कम आगाऊ दिली होती आणि त्याच पैशांतून आरोपींनी ही हत्यारे खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांची वेगवान कारवाई; नऊ पैकी आठ आरोपी ताब्यात

घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर बोलताना आयुक्तांनी पोलिसांची तत्परता अधोरेखित केली. घटना घडताच तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी जखमी मंदारला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. अर्ध्या तासाच्या आत उपचार सुरू झाल्याने डॉक्टरांच्या मते त्याचा जीव वाचला आहे. हल्ल्यानंतर अवघ्या एक ते दीड तासात तीन आरोपींना पुण्याच्या विविध भागांतून ताब्यात घेण्यात आले. दौंडच्या दिशेने पळून जाणाऱ्या इतर आरोपींनाही साडेचार वाजेपर्यंत म्हणजेच साडेतीन तासांच्या आत पोलिसांनी जेरबंद केले. आतापर्यंत या प्रकरणातील एकूण नऊ पैकी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (DCP Crime) स्वतः या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

एका घटनेमुळे संपूर्ण शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर टीका योग्य नाही 

“शिवाजीनगर न्यायालयासमोर रस्त्यावर घडलेली कालची घटना निश्चितच अत्यंत गंभीर आहे; मात्र, केवळ एका घटनेवरून संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे किती योग्य आहे, याचा नागरिकांनीच विचार करायला हवा. गेल्या सहा महिन्यांचा आढावा घेतल्यास शहरात गोळीबार किंवा कोयता हल्ल्यांसारखा कोणताही मोठा गंभीर गुन्हा घडलेला नव्हता आणि गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. कालचा प्रकार अपवादात्मक आणि गंभीर असला, तरी या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि दिलेला वेगवान प्रतिसादही लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.” असल्याचे मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.

Exit mobile version