Mega Job Fair across Maharashtra state on September TwentyNine how to get in touch? Find out here : नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून 29 सप्टेंबर 2026 रोजी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-2026’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून 10वी, 12वी, आयटीआय उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. याशिवाय उमेदवारांना मुलाखतीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
ब्रेकिंग- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
या उपक्रमासाठी राज्यातील शासकीय तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा सहभाग असणार असून, तब्बल 800 ठिकाणी रोजगाराशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे (DVET) देण्यात आली आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांची नोंदणी करून त्यांना संबंधित मेळाव्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी स्थानिक आयटीआयच्या निदेशकांवर सोपवण्यात आली आहे.
नोकरीसोबत स्वयंरोजगाराच्या संधी
युवकांना केवळ नोकरी मिळवून देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून स्वयंरोजगार, कौशल्यविकास आणि उद्योजकतेच्या विविध संधींशी त्यांना जोडणे हा देखील यामागील प्रमुख हेतू आहे. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-2026’च्या माध्यमातून 29 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी राज्यात 500 पेक्षा अधिक रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे विविध उद्योग आणि कंपन्यांमधील उपलब्ध रोजगाराच्या संधी उमेदवारांना एकाच व्यासपीठावर मिळण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात 30 संस्थांमध्ये रोजगार मेळावे
पुणे जिल्ह्यातही या उपक्रमाची तयारी सुरू आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील 30 शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांमध्ये विविध कंपन्या, उद्योग आणि आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उद्योगांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या शिक्षण आणि कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो.
युवक आणि उद्योगांमधील दुवा मजबूत करण्याचा प्रयत्न
राज्यातील युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये मिळावीत आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी, यासाठी शासनाकडून विविध कौशल्यविकास कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून एका बाजूला रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना संधी उपलब्ध करून देण्याचा, तर दुसरीकडे उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे युवक आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.
पुण्यातील उमेदवारांनी कुठे संपर्क साधावा?
पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, पुणे-11 येथे संपर्क साधता येईल. दूरध्वनी क्रमांक : 020-26133606 तसेच रोजगार आणि संबंधित संधींची अधिक माहिती मिळवण्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.
