Metro to run in Hinjewadi IT Park : पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाची दुसरी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, मार्च 2026 पर्यंत ही मेट्रो प्रत्यक्ष प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी परिसरातील दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आयटी पार्क म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीची सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. दररोज हजारो आयटी कर्मचारी या मार्गावर तासनतास अडकून पडतात. मात्र, मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी आणि शिवाजीनगर या दोन महत्त्वाच्या आयटी हबदरम्यानचा प्रवास आता वेगवान आणि सुलभ होणार आहे.
सोशल मीडियावरील ‘क्लीन इमेज’ ठरली तस्करीचं कवच; गांजाच्या तस्करीप्रकरणी सर्पमित्र आकाश जाधवला अटक
सध्या गर्दीच्या वेळेत हा प्रवास करण्यासाठी 45 ते 60 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, 23.33 किलोमीटर लांबीचा हा एलिव्हेटेड मेट्रो कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत हा प्रवास पूर्ण होईल. या मार्गावर एकूण 23 उंचावरील स्थानकांचा समावेश असून, संपूर्ण मार्गावरील तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मार्च किंवा एप्रिल 2026 पर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंजवडी फेज 1, 2 आणि 3 मध्ये काम करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांना यामुळे वाहतूक कोंडीसह प्रदूषणातूनही दिलासा मिळणार आहे. दररोज सुमारे दोन लाखांहून अधिक प्रवासी या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज आहे. दरम्यान, सिव्हिल कोर्ट स्थानकावर पीसीएमसी-स्वारगेट आणि वनाझ–रामवाडी या दोन मेट्रो मार्गांशी इंटरचेंज उपलब्ध होणार असल्याने पुणे शहरातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. हिंजवडी मेट्रोमुळे पुण्याच्या आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास केवळ जलदच नव्हे, तर अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
