Download App

“बारामतीकर न मागता सगळं देतात”, कृषी खात्याच्या चर्चांवर भरणे मामांचं सूचक वक्तव्य

Dattatreya Bharane : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा (Manikrao Kokate) विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोकाटेंचे खाते बदलण्याचा निर्णय झाला. कोकाटे यांचे कृषी खाते मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर मंत्री भरणे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिलं आहे. बारामतीकर न मागता सगळं देतात असे भरणे म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले दत्तात्रय भरणे?

कृषी खात्याच्या संदर्भात मला अजून तरी काहीही माहिती नाही. बारामतीकर न मागता सगळं देतात. मला कारखान्यात, जिल्हा परिषद, आमदारकी आणि मंत्रिमंडळात न मागता संधी दिली. त्यामुळे कोण काय करतं हे वरिष्ठांना सगळं माहिती असतं असे मत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. मला याबाबत ज्या वेळेस अधिकृत माहिती येईल त्यावेळी मी तुमच्याशी बोलेल असेही भरणे यावेळी म्हणाले.

दादा, भाऊ अन् तटकरेंच्या बैठकीनंतर कोकाटेंकडून ‘ओसाड गावची पाटीलकी’ काढून घेतली जाणार

मंत्री दत्ता भरणे आणि मकरंद पाटील या दोन मंत्र्यांकडे असलेली खाती कोकाटे यांना दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारी दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील या दोघांपैकी एकाला मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यावरुन स्पष्ट होत आहे की विरोधकांच्या दबावाला बळी न पडता कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. फक्त त्यांच्याकडील खाते काढून त्यांना दुसरे खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे.

धनंजय मुंडेंना संधी मिळणार का?

दरम्यान, धनंजय मुंडे देखील कृषी खात्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंडेंना पु्न्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल का असा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या अनेकांकडून आरोप होत आहेत. काल भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुंडे यांना कृषीशी निगडीत खरेदी या एकाच प्रकरणात दिलासा मिळालेला आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात भ्रष्टाचार झालेला आहे.

सत्ताधारी पक्षातीलच आमदार त्यांच्यावर आरोप करत आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही धस यांनी दिला आहे. त्यामुळे मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंडेंनी घेतली होती. तब्बल अर्धा तासांची ही भेट होती. ही काही राजकीय भेट नव्हती. परळी मतदारसंघातील विविध विकासकामांची यादी घेऊन मुंडे यांनी भेट घेतल्याचे नंतर सांगण्यात आले. त्यानंतर आजही अजित पवार यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीतून मंत्रिपदाची चर्चा झाली का याची माहिती अजून तरी मिळालेली नाही.

Malegaon Blast : ‘एनआयएने पुरावेच सादर केले नाही…’; पृथ्वीराज चव्हाणांचे केंद्रीय तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह

follow us