आजोबा चार वेळा मुख्यमंत्री होते, कितीवेळ MPSC’साठी वेळ दिला?; पडळकरांचा रोहित पवारांना थेट सवाल

MPSC Student Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

News Photo   2026 10 03T211914.513

MPSC Student Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. एस एम जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. दरम्यान, या आंदोलनावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. एमपीएससीच्या कारभारावरून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण केलं जात असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.

रोहित पवार यांच्या भूमिकेवर टीका करताना पडळकर यांनी शरद पवार यांच्या राजकीय वारशाचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. आजोबा चार वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी एमपीएससीसाठी किती वेळ दिला, असा सवाल पडळकर यांनी केला. एमपीएससीचा वापर राजकारणासाठी करणार नसल्याचं सांगत त्यांनी रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना राजकारणाच्या बाजारात ओढण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री कार्यालयात पोस्टींग ते MPSC अध्यक्ष! भीमनवारांची कारकीर्द अन् आरोपांचा डोंगर?

एमपीएससीच्या आंदोलनात फूट पाडण्यामागे रोहित पवार जबाबदार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला. सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना या प्रश्नावर श्रेय मिळू नये, म्हणून राजकारण केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. एमपीएससीच्या परीक्षा, निकाल आणि नियुक्त्यांना होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचंही पडळकर यांनी मान्य केलं. परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, निकाल लवकर लागावेत आणि आयोगातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतही योग्य व्यवस्था असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, एमपीएससीच्या पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. या प्रश्नावर व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून परीक्षा प्रक्रिया सुधारण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. तसेच एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती 2 ऑक्टोबर रोजी प्रशासकीय कारणास्तव संपवण्यात आली आहे. मात्र अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी अद्याप कायम असून, त्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत.

Exit mobile version