पुणे : लोकसभा निवडणूक लढण्याच्या संदर्भाने माझ्या डोक्यात काहीच नाही. पक्ष जे सांगेल तो निर्णय मान्य असेल, असे म्हणत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी त्यांची उमेदवारीबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे (Pune) मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. (Muralidhar Mohol clarified his Stand regarding the candidature in the Pune Lok Sabha elections.)
या पार्श्वभूमीवर बोलताना मोहोळ म्हणाले, इतर पक्षात आणि आमच्यात एक फरक तुम्हाला सांगतो. आमच्याकडे इच्छा व्यक्त केल्याने आणि स्वतःला काय हवे याला अजिबात महत्व नसते. आमच्या इथे संघटनेच्या स्तरावर जो निर्णय घेतला जातो तो सगळ्यांना मान्य करावा लागतो. त्यामुळे कोणी इच्छुक आहे कोण नाही या चर्चाला काहीच अर्थ नाही. त्याचमुळे माझ्याही डोक्यात काहीच नाही. पक्ष सांगेल तो निर्णय मान्य करणार आहे.
शहरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय व्यक्तीमत्व असलेले मुरलीधर मोहोळ हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. पुणे महापालिकेत महापौर म्हणून काम करताना त्यांची कामसू महापौर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याशिवाय सध्या ते भाजपचे सरचिटणीस पदाची जबाबदारी संभाळत आहे. तसेच, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप नेते सुनील देवधर यांचा वावर वाढत आहे. ते सध्या लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच त्यांनी उमेदवारीबाबत घोषणाही केल्याने आता पुणे लोकसभा निवडणुकीसाठी देवधर यांचं नाव चर्चेत आलं आहे. “पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभा निवडणूक लढवणार, मी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक अशी भूमिकाही त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना स्पष्ट केली आहे. जनतेचं राजकारण करायला मला आवडेल. लोकसभेसाठी संधी दिली तर मी नाही म्हणणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.